चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाचे पिक लावणार्‍या शेतकर्‍याला अटक !

शेतकर्‍याकडून १० फूट उंचीची ६६ झाडे आणि ११ लाखांचा गांजा जप्त !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – मक्याच्या शेतात गांजाची ६६ झाडे लावल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी सदाशिव देशमुख या शेतकर्‍याला अटक केली आहे, तसेच ११ लाख ५० सहस्र रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला. चाकण जवळील आगरवाडी येथे २२ एप्रिलला दुपारी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, चाकण पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांना आगरवाडी रस्त्यावरील एका शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चाकण पोलिसांनी चाकण-काळूस रस्त्यावरील सदाशिव देशमुख यांच्या शेतात जाऊन निश्चिती केली. त्या वेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. ८ ते १० फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो होते. तर याची किंमत ११ लाख ५० सहस्र रुपये आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली आहेत.