नागपूर येथे नागरिकांची अडीच लाख रुपयांची लूट करणारे २ पोलीस कर्मचारी निलंबित !

नागपूर – १३ एप्रिल या दिवशी जबलपूर मार्गावर महिलेसह कारमध्ये बसलेल्या तरुणाला २ पोलिसांनी धमकी देऊन त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांचा सोन्याचा माल लुटून नेल्याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या निर्देशानंतर वाथोडा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये पोलीस हवालदार संदीप यादव आणि पंकज यादव दोषी आढळले. त्यानंतर या दोघांना निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्यावर चोरीचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील गणेशपेठ येथे हा तरुण रहातो. त्या दिवशी तरुण आणि महिला कारमध्ये अनैतिक प्रकार करत होते. त्या वेळी कळमना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव तेथे आले. त्यांनी त्या तरूण आणि महिला यांना कारमधून बाहेर काढले. त्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, तसेच ‘तुमच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलावून अपर्कीत करण्यात येईल’, असे धमकावले. या दोघांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन दोघांना सोडून दिले. त्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

संपादकीय भूमिका :

  • नागरिकांवर दरोडा घालणारे पोलीस असणे, हे महाराष्ट्रातील पोलिसांना लज्जास्पद !
  • राज्यातील नागरिकांच्या रक्षणाचे दायित्व पोलिसांवर असते. पोलीसदलाचे घोषवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ आहे. (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश); परंतु पोलीस दुर्जनांसारखे वागू लागल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असे प्रकार घडत आहेत. यातील दोषी पोलीस कर्मचार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !