भारताला लाभलेली प्राचीन हिंदु संस्कृती हे देशाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीचा भाग असलेली विवाहसंस्था जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही. ‘विवाह पृथ्वीतलावर होत असले, तरी जोडीदाराच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात’, अशी समजूत भारतियांत पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे ‘घटस्फोट’ हा शब्द भारतीय शब्दकोशात कुठेही सापडत नाही. विवाहसंस्काराच्या माध्यमातून ७ जन्मांची गाठ बांधली जाते. या संस्कारात देवाब्राह्मणांच्या साक्षीने जन्मभर एकमेकांशी प्रामाणिक रहाण्याचे, एकमेकांची काळजी घेण्याचे वचन दिले आणि घेतले जाते. या पवित्र संस्काराने बद्ध झालेले उभयता आयुष्यात येणार्या सुखदुःखाच्या प्रसंगांना नेटाने सामोरे जातात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देत संसाराचे गाडे हाकतात.
‘गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांवर पाश्चात्त्य विकृतीचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला आहे. भारतात वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाणही याचीच फलश्रुती आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वर्ष २०२१ मध्ये देशाच्या कौटुंबिक न्यायालयांत घटस्फोटांचे ५ लाख खटले प्रलंबित होते. वर्ष २०२३ मध्ये हीच संख्या ८ लाखांपर्यंत पोचल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. घटस्फोटांच्या खटल्यांत वर्षागणिक होत जाणारी वाढ भविष्यात पश्चिमी देशांना मागे टाकू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रतिवर्षी घटस्फोटांची जेवढी प्रकरणे न्यायालयात निकाली काढली जातात, तेवढीच किंबहुना त्याहून अधिक नवीन प्रकरणे न्यायालयात नव्याने प्रविष्ट होतात. त्यामुळे येणार्या काळात देशाची कुटुंबव्यवस्था संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरुण पती-पत्नी विभक्त झाल्याने सर्वाधिक परिणाम त्यांच्या अपत्यांवर होतात. अशा अपत्यांमध्ये एकलकोंडेपणा, द्वेष, चिडचिड करणे, सूडभावनेने वागणे यांसारखे दोष प्रकर्षाने दिसून येतात. घटस्फोटित पालकांची मुले नकळतपणे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आले आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतात होणार्या घटस्फोटांची टक्केवारी अल्प असली, तरी आज या प्रकारांवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात ती भीषण स्वरूप धारण करू शकते. याचा परिणाम सामाजिक व्यवस्थेवर होऊ शकतो. विवाह करतांना प्रत्येक मुलामुलीने स्वतःच्या भावी आयुष्याविषयी अनेक स्वप्ने रंगवलेली असतात. या स्वप्नांचा चुराडा करणारा घटस्फोट कुणालाही नको असतो; मात्र तो आयुष्यात येण्यामागे कारणेही तितकी गंभीर आणि विविध असतात; परंतु भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई