US threatens Pakistan: इराणशी व्यापार केल्यास निर्बंध लादण्याची अमेरिकेची पाकला धमकी !

वॉशिंग्टन – इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसदृश स्थिती असतांना इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचे भव्य स्वागत करणार्‍या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारला अमेरिकेने उघडपणे धमकी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून पाकिस्तान आणि इराण यांच्यामधील व्यावसायिक करारावर ‘संभाव्य निर्बंधांचा धोका आहे’, अशी चेतावणी दिली.

इराण आणि पाकिस्तान यांनी परस्पर व्यापार १० अब्ज डॉलरपर्यंत (सुमारे ८३ सहस्र ३४१ कोटी रुपये) वाढवण्याचे निश्‍चित केले आहे. इस्रायलवरील आक्रमणानंतर अमेरिकेने इराणवर अनेक नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

सौजन्य Navbharat Times

१. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणसोबत व्यापार करण्याचा विचार करणार्‍या देशांनी निर्बंधांच्या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवली पाहिजे.

२. अमेरिका ही पाकिस्तानसाठी सर्वांत मोठी निर्यात बाजारपेठ आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानमधील सर्वांत मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिका आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.

३. पाकिस्तानला आता इराणसोबत ‘गॅस पाइपलाइन’चे काम करायचे आहे; पण अमेरिका त्याला संमती देत नाही. यामुळे भविष्यात पाकिस्तानवर अमेरिकेकडून निर्बंध लादले जाऊ शकतात.