गोवा : कला अकादमीतील एका ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला !

विरोधकांकडून कामाच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित !

(फॉल्स सिलिंग म्हणजे प्लायवूड किंवा तत्सम वस्तूंपासून बनवलेले छत)

कला अकादमीचे कोसळलेले ‘फॉल्स सिलिंग’ !

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) : ७५ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या पहिल्या मजल्याच्या ‘फॉल्स सिलिंग’चा काही भाग २२ एप्रिल या दिवशी पहाटे कोसळला. यामुळे विरोधकांकडून कामाच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते.

(सौजन्य : गोवनवार्ता)

या कामाच्या दर्जाविषयी विरोधकांनी नेहमीच आरोप केले आहेत. विधानसभेतही कला अकादमीच्या नूतनीकरणाचे सूत्रही बरेच गाजले होते. कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या मागील बाजूच्या छताचा काही भाग २२ एप्रिल या दिवशी कोसळल्याने एकच खळबळ माजली. छताचे तुकडे भूमीवर कोसळल्यानंतर छतामध्ये घातलेल्या लोखंडी सळ्या बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. त्यातून पाण्याची गळती झाल्याने भूमीवर सर्वत्र पाणी साचले होते. याविषयी माहिती मिळताच पत्रकारांनी कला अकादमीत धाव घेतली; मात्र सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना प्रवेशद्वारावरच अडवले आणि नंतर प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. अवेळी पडलेल्या पावसामुळे ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळल्याचे म्हटले जाते. या पावसामुळे अकादमीच्या वास्तूची एवढी हानी झाली, तर भर पावसाळ्यात काय अवस्था होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जुलै २०२३ मध्ये कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा भाग कोसळला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपल्यानंतर काही दिवसांनी मंगेशकर नाट्यगृहातील छताचा काही भाग कोसळून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत होते. यानंतर पुढे एक दिवस कला अकादमीत साप घुसला होता. आता पुन्हा छत कोसळल्याने पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, ‘‘कला अकादमीच्या इमारतीचा ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळल्याच्या प्रकरणी राज्य सरकार अन्वेषण करणार आहे. याविषयी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.’’

सार्वजनिक बांधकाम खात्याने याविषयी उत्तर द्यावे ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री

कला अकादमीचे दुरुस्तीकाम कला आणि संस्कृती खाते करत नाही, तर ते सार्वजनिक बांधकाम खाते करते. कला आणि संस्कृती खात्याने त्यांना जाणवलेल्या त्रुटी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याला दाखवून दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता आणि खात्याचा पदभार सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी माहिती द्यावी, असे आवाहन कला अकादमीचे दायित्व सांभाळणारे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.