आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत : एक फसवणूक !

‘एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा चुकीचा’, असे सांगितल्याचे प्रकरण

‘इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून इतकी वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा आहे, असे ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एन्.सी.ई.आर्.टी.) यापुढे नमूद करणार आहे, ही आनंदाची बातमी ! तिचे स्वागत करायलाच हवे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

श्री. अभिजित जोग

१. ‘आर्यांचे आक्रमण’ याचा सिद्धांताचा उगम

ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाच्या आधी आर्यांच्या आक्रमणाचा उल्लेखही भारतात कधी झाला नव्हता. किंबहुना प्राचीन काळात पश्चिमेकडून भारतावर मोठे आक्रमण झाल्याचा कुठलाही उल्लेख भारतातील प्राचीन साहित्य आणि परंपरा यांत कधीही झालेला नाही. इ.स. १६१४ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सर थॉमस रो हा जहांगीर बादशाहच्या दरबारात आला आणि त्याने भारतात व्यापार करण्याची अनुमती मिळवली. व्यापाराच्या निमित्ताने अनेक ब्रिटीश लोक भारतात येऊ लागले. त्या वेळी वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा आणि कुतूहल असलेले युरोपियन लोक विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेत होते. असेच काही लोक ईस्ट इंडिया कंपनीसमवेत भारतात आले. त्यांनी जेव्हा भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास चालू केला, तेव्हा भारतीय संस्कृतीची प्राचीनता अन् वैभव यांच्या दर्शनाने ते थक्क झाले.

(तत्कालीन) ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह

एक विशेष गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती, म्हणजे भारतीय भाषा, त्यातही विशेषतः संस्कृत भाषेचे युरोपातील विविध भाषांशी असलेले विलक्षण साम्य. हे साम्य वरवरचे नव्हते, तर ते इतके मूलभूत होते की, दक्षिणेला श्रीलंका ते युरोपच्या उत्तरेला असलेल्या आईसलँडपर्यंत बोलल्या जाणार्‍या अनेक भाषा या एकमेकींच्या भगिनी आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. भाषांच्या या गटाला त्यांनी ‘इंडो-युरोपियन भाषा’ असे नाव दिले. त्याविषयी प्रा. मॅक्समूल्लरनेही असे म्हटले की, युरोपमधील भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे, हे आम्हाला जाणवत होते; पण ते साम्य कसे आणि कुठून आले, हे मात्र कळत नव्हते. जेव्हा आम्ही भारतात येऊन संस्कृतचा अभ्यास केला, तेव्हा आमच्या लक्षात आले की, युरोपियन भाषांमधील साम्य त्यांच्या संस्कृतशी असलेल्या नात्यामुळे निर्माण झाले आहे. याचा अर्थ असा की, युरोपमधील भाषांची निर्मिती प्राचीन संस्कृतपासून झाली आहे, हे त्यांनी मनोमन मान्य केले.

हा साक्षात्कार त्यांच्यासाठी तोपर्यंत गैरसोयीचा नव्हता, जोपर्यंत भारतातील त्यांची महत्त्वाकांक्षा व्यापारापर्यंतच मर्यादित होती; पण जसजशी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत होऊ लागली आणि भारतावर आपण प्रदीर्घ काळ राज्य करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले, तशी ही गोष्ट त्यांच्यासाठी गैरसोयीची ठरू लागली. ‘आपली भाषा आणि संस्कृती यांचा उगम आपल्या गुलामांच्या भाषेतून झाला आहे’, हे मान्य करणे त्यांच्यासाठी अशक्य होते. यासह त्यांना हेही ठाऊक होते की, सहस्रो किलोमीटरवरील या खंडप्राय देशावर आपण केवळ लष्करी बळाच्या आधाराने फार काळ राज्य करू शकणार नाही. या दोन्ही अडचणींवर मात करण्यासाठी चलाख इंग्रजांनी असे ठरवले की, भारतियांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास नष्ट करायचा, म्हणजे ते मेंढरांसारखे आपल्या मागे येतील अन् ‘इंग्रजी राज्य हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे’, असे समजून गुलामीतच आनंद मानतील. हे साधण्यासाठी त्यांनी काढलेली एक युक्ती म्हणजे ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’.

२. ‘आर्य आक्रमणाचा’ प्रमुख प्रवर्तक मॅक्समुलर आणि त्याने केलेले षड्यंत्र !

मॅक्समुलर

हा सिद्धांत असे सांगतो की, रशियाच्या दक्षिणेकडे असलेल्या ‘युरेशियन स्टेप्स’ या डोंगराळ आणि गवताळ प्रदेशातून सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे गौरवर्णीय आर्य मध्य आशिया, इराण यामार्गे भारतात आले अन् त्यांनी येथे संस्कृत भाषा, तसेच वैदिक संस्कृतीची निर्मिती केली. याचा अर्थ असा ‘ऋग्वेद’ हा जगातील सगळ्यात प्राचीन ग्रंथ असला आणि संस्कृत ही श्रेष्ठ भाषा असली, तरी त्यांची निर्मिती भारतियांनी केली नसून पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या लोकांनी केली आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या चाकरीत असलेला मॅक्समुलर हा जर्मन विद्वान या सिद्धांताचा एक प्रमुख प्रवर्तक होता. त्याने ‘आर्यांचे हे आक्रमण इ.स.पूर्व १५०० मध्ये झाले, तर ‘ऋग्वेद’ची निर्मिती इ.स.पूर्व १२०० मध्ये झाली’, असे ठरवले. गौतम बुद्धांचा काळ इ.स.पूर्व ५५० असल्याचे ज्ञात होते. त्यामुळे इ.स.पूर्व १२०० ते ५५० हा काळ इतर वेद, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे, सूत्रे या वैदिक वाङ्मयासाठीच अपुरा होता. इतर प्राचीन भारतीय वाङ्मय, परंपरा आणि आपल्या संस्कृतीत ज्यांना इतिहास मानले जाते, त्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्यासाठी तर वेळच उरला नाही. त्यामुळे ‘ही सगळी वैभवशाली परंपरा या भाकडकथा (मायथॉलॉजी) आहेत’, असे सांगून त्यांचा निकाल लावण्यात आला.

असे सांगण्यात आले, ‘इ.स.पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळी जेव्हा तुमचा संबंध ग्रीक लोकांशी आला, तेव्हा विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला यांच्याशी तुमची ओळख झाली.’ याचा अर्थ तुमच्याकडे जे काही चांगले आहे, ते तुम्हाला पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या लोकांनीच दिलेले आहे. हीच तुमची परंपरा, इतिहास आहे. आता पश्चिमेकडून गोरे ब्रिटीश आले आहेत. त्यांच्या राज्याचा आणि वर्चस्वाचा स्वीकार करणे, यातच तुमचे हित आहे. भारताची संस्कृती अन् आत्मसन्मान यांच्यावर झालेला हा एक मोठा आघात होता, ज्यातून भारतियांच्या मनात न्यूनगंडाची भावना आणि ब्रिटिशांची चाकरी करण्यातच धन्यता मानण्याची मानसिकता निर्माण झाली.

३. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत काल्पनिक असल्याचे मॅक्समुलर याने स्वतः मान्य करणे

महत्त्वाची गोष्ट अशी की, भारताच्या इतिहासात मोठी उलथापालथ घडवून आणणारा हा सिद्धांत पूर्णतः काल्पनिक असून तो प्रस्तुत करतांना त्यासाठी कुठलाही पुरावा देण्यात आला नाही आणि आजवर एकही पुरावा या सिद्धांताच्या समर्थकांना देता आलेला नाही, तसेच ‘आर्यांच्या या आक्रमणाचा इ.स.पूर्व १५०० हा कालखंड पूर्णतः काल्पनिक आहे’, असे स्वतः मॅक्समुलर यानेच नंतर मान्य केले. तो म्हणतो, ‘वैदिक वाङ्मयाशी मी ज्या तारखा जोडल्या त्या पूर्णपणे काल्पनिक होत्या, हे मी वारंवार सांगितले आहे. वैदिक मंत्र इ.स.पूर्व १०००, १५००, २००० कि ३००० मध्ये रचले गेले ? हे जगातील कुठलीही शक्ती कधीही निश्चित करू शकणार नाही.’

असे असूनही आर्यांच्या आक्रमणाचा खोटा सिद्धांत आणि त्याचा इ.स.पूर्व १५०० हा काल्पनिक कालखंड ‘अधिकृत इतिहास’ म्हणून आजही शिकवला जातो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

४. ‘भारतीय समाज एक होऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणार नाही’, यासाठी ब्रिटिशांनी आर्य-अनार्य वाद निर्माण करणे

हा सिद्धांत मांडला गेला, त्या वेळी सिंधू-सरस्वती संस्कृतीचा, म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा शोध लागला नव्हता. वर्ष १९२२ मध्ये मोहेंजोदारो आणि हडप्पा या ठिकाणी या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. यानंतर या संस्कृतीची जवळपास २ सहस्र ५०० ठिकाणे शोधण्यात आली आहेत अन् ‘ही संस्कृती २० लाख चौरस किलोमीटर प्रदेशात पसरलेली, साधारणतः १० सहस्र वर्षांपासून अस्तित्वात असलेली जगातील एक प्राचीन संस्कृती आहे’, हे सिद्ध झाले आहे. या संस्कृतीचा विलय साधारणतः इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास झाला असावा, असे लक्षात आले. हा काळ मॅक्समुलरने सांगितलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या काल्पनिक कालखंडाशी जुळत होता. त्यामुळे ‘हा आर्यांच्या आक्रमणाचा अंतिम पुरावा असल्याचे सांगून त्यांनीच या प्राचीन संस्कृतीचा विनाश केला’, असे प्रतिपादन करण्यात आले. याचा वापर भारतात अधिकाधिक फूट पाडण्यासाठी करण्यात आला. ‘सिंधू-सरस्वती संस्कृती ही द्रविड संस्कृती होती, जिचा आक्रमक आर्यांनी विनाश केला आणि द्रविड वंशाच्या लोकांना दक्षिणेकडे ढकलून दिले’, असे सांगण्यात आले, तसेच आक्रमक आर्य, म्हणजे उत्तर भारतीय आणि उच्च जातींचे लोक, तर दक्षिण भारतीय अन् बहुजन समाजातील लोक म्हणजे भारतातील मूलनिवासी असा सिद्धांत मांडण्यात आला. त्यामुळे ‘भारतात उत्तर विरुद्ध दक्षिण, संस्कृत विरुद्ध तमिळ, हिंदी विरुद्ध तमिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज असे अनेक संघर्षबिंदू निर्माण करून हा संघर्ष सतत भडकता राहील आणि भारतीय समाज एक होऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणार नाही’, असा प्रयत्न करण्यात आला. आजही ‘भारत तोडो’ या अजेंड्यासाठी (कार्यसूचीसाठी) कार्यरत असलेल्या विविध शक्ती आर्यांच्या आक्रमणाच्या काल्पनिक सिद्धांताचाच आधार आपल्या कारवायांसाठी घेतात; पण ‘सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात आढळलेले पुरावे मात्र हे सगळे प्रतिपादन पूर्णतः चुकीचे आहे’, असे सिद्ध करतात. या उत्खननात आढळलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, जीवनशैली, खाणे-पिणे, कपडे, धार्मिक रिती-परंपरा या प्रत्येक विषयांमध्ये गेली १० सहस्र वर्षे एक विलक्षण सातत्य भारतात आढळून येते. यामध्ये परकियांनी नवी संस्कृती लादल्याचे वा मोठी सांस्कृतिक उलथापालथ केल्याचे कुठलेही पुरावे आढळत नाहीत.

५. ‘ऋग्वेदा’तील ‘महाशक्तीशाली’ सरस्वती नदीचा उल्लेख हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खोटा असल्याचे सांगण्यास पुरेसा !

या संस्कृतीचा विलय इ.स.पूर्व २२०० ते १९०० या कालावधीत पडलेल्या भीषण दुष्काळामुळे झाला; कारण या दुष्काळात सरस्वती नदी पूर्णतः कोरडी पडून लुप्त झाली, असे आता सिद्ध झाले आहे. ‘ऋग्वेदा’त मात्र सरस्वती नदीचे वर्णन ‘प्रचंड मोठी’ आणि ‘महाशक्तीशाली नदी’ असे करण्यात आले आहे. या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेद जर इ.स.पूर्व १२०० मध्ये लिहिला गेला असेल, तर त्याआधी ७०० वर्षे, म्हणजेच इ.स.पूर्व १९०० मध्ये लुप्त झालेल्या सरस्वतीचा उल्लेख त्यात ‘महाशक्तीशाली’ असा केलेला असणे, हे अशक्यच आहे. हा एकच पुरावा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. याखेरीज ‘ऋग्वेदा’त आर्य बाहेरून आल्याचा, त्यासाठी त्यांनी केलेल्या सहस्रो किलोमीटर प्रवासाचा, भारताबाहेरील त्यांच्या वास्तव्याचा एकही उल्लेख आढळत नाही. राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या सांगाड्यातून काढलेल्या ‘डी.एन्.ए.’चे (अनुवांशिकता) विश्लेषण केले असता सिंधू-सरस्वती संस्कृतीतील लोकांचा आणि आजच्या भारतातील सर्व जातींचा, तसेच आदिवासींचा ‘डी.एन्.ए.’ एकच असल्याचे आढळून आले आहे.

६. देशाचे तुकडे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काँग्रेस आणि साम्यवादी यांच्याकडून खोटा इतिहास शिकवला जाणे

एन्.सी.ई.आर्.टी चा लोगो

अशा असंख्य पुराव्यांवरून आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा पूर्णतः काल्पनिक आणि खोटा असल्याचे आता वादातीतपणे सिद्ध झाले आहे. हा सिद्धांत ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ पाठ्यपुस्तकांमधून शिकवला जात होता; कारण ब्रिटीश गेले, तरी स्वतंत्र भारतात ‘इतिहास’ या क्षेत्रावर साम्यवाद्यांची संपूर्ण पकड होती. ‘भारताचे तुकडे करणे’, हेच त्यांचे मूळ उद्दिष्ट असल्यामुळे हा सिद्धांत त्यांच्यासाठी सोयीचा होता. हिंदु समाज जातीजातींमध्ये विभागलेला असणे, हे सत्ताधीश काँग्रेससाठीही सोयीचेच होते आणि म्हणून त्यांनी तो तसाच चालू ठेवला.’

– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डाव्यांची वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (५.४.२०२४)

(साभार : साप्ताहिक ‘विवेक’ आणि श्री. अभिजित जोग यांचे फेसबुक)