मुंबई – ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही. प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही, अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मांडली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारगीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा आहे. यामधील ‘जय भवानी’ असा उल्लेख काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे नमूद करत त्याविषयीची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करण्याचे ठरवले, तर आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी लागेल. मध्यप्रदेश निवडणुकीच्या वेळी ‘बजरंग बली’ असा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी निवडून देण्याचे आवाहन केले होते. मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही ?’’