UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !

५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटन सरकारने ब्रिटनमध्ये रहाणार्‍या अनिवासी भारतियांना बँकांतील मुदत ठेवी (एफ्.डी.), शेअर बाजार आणि भारतातील भाड्यातून मिळणारे उत्पन्न यांवर मिळणारी कर सवलत १५ वर्षांवरून ४ वर्षांपर्यंत न्यून केली आहे. आता ब्रिटनमध्ये राहिल्याच्या ५ व्या वर्षापासून अनिवासी भारतियांना त्यांच्या भारतातील उत्पन्नावर ५० टक्के कर भरावा लागणार आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे.

लंडनमधील कर सल्लागार सौरभ जेटली म्हणाले की, ब्रिटन सरकारच्या नव्या कायद्यानंतर अनिवासी भारतियांचा ब्रिटनमध्ये व्यवसाय करण्याविषयी भ्रमनिरास होत आहे. या नियमानंतर ब्रिटनमध्ये रहाणार्‍या ५ लाख अनिवासी भारतियांपैकी अनुमाने ५० सहस्रांनी दुबईत स्थलांतर करण्याची योजना आखली आहे; कारण दुबईमध्ये वैयक्तिक कराचे प्रमाण शून्य आहे आणि सामायिक (कॉर्पोरेट) कर केवळ ९ टक्के आहे. लंडनमध्ये मालमत्ता कर ४० टक्के, तर दुबईमध्ये शून्य टक्के आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत; म्हणून कौतुक वाटणार्‍या भारतियांंना ही चपराकच आहे !

भारतीय पुजार्‍यांना व्हिसा नसल्याने ब्रिटनमधील ५० मंदिरे बंद !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नसल्यामुळे ब्रिटनमधील अनुमाने ५०० मंदिरांपैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित अनेक मंदिरांमधील कामे ठप्प झाली आहेत.

संपादकीय भूमिका

भारतात आल्यावर मंदिरात जाऊन स्वतःला धार्मिक असल्याचे दाखवणारे सुनक यांचा कारभार हिंदूंच्या संदर्भात कसा आहे ?, हे लक्षात घ्या !