३ चिनी कंपन्यांचा, तर १ बेलारूसच्या कंपनीचा समावेश
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय ?
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे सामूहिक संहारक शस्त्र म्हणून ओळखले जाते. ध्वनीहून अधिक वेगाने अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याचे सामर्थ्य आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यांमुळे आक्रमक कारवाईत कुठल्याही देशाच्या विरोधात ते वापरले जाऊ शकते.
वॉशिंग्टन – पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी अमेरिकेने ४ कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये ‘लाँगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट की शी’, ‘टियांजिन क्रिएटिव्ह सोर्स इंटरनॅशनल ट्रेड’ आणि ‘ग्रॅनपेक्ट कंपनी लिमिटेड’ या ३ चिनी कंपन्यांचा, तर बेलारूसच्या ‘मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लांट कंपनी’ या एका कंपनीचा समावेश आहे. या कंपन्यांवर पाकिस्तान निर्माण करू पहात असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना सुटे भाग पुरवल्याचा ठपका आहे. ‘या चारही कंपन्या मोठ्या प्रमाणात संहारक शस्त्रांच्या प्रसारात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले.
या बंदीनंतर या कंपन्यांची अमेरिकेतील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. कंपनीचे मालक आणि प्रमुख भागधारक यांच्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. याआधीही अमेरिकेने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी ३ चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले होते.