India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक

वॉशिंग्टन – भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम्.एफ्.) आणि जागतिक बँक यांनी कौतुक केले आहे. ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांची वार्षिक बैठक अमेरिकेत चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाही. भारताचे आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रमुख शक्तिकांता दास यांच्यासारखे उच्च अधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेत जागतिक सूत्रांवर ज्या प्रकारे एकमत झाले, ते कौतुकास्पद आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !

या बैठकीत ‘वित्तीय धोरणांमुळे भारतासह उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक स्थैर्य राखले जाते’, असे सांगण्यात येऊन भारताचे कौतुक करण्यात आले. या बैठकीत हवामान पालटाचा सामना करण्यासाठी वित्तपुरवठा कसा करावा ? यावर चर्चा झाली. सध्या  ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ‘जी-२०’ परिषद होणार आहे. १७ आणि १८ एप्रिल या दिवशी ‘जी-२०’ अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक झाली. या वेळी आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, जपान, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या आर्थिक व्यवहार सचिवांसमवेत द्विपक्षीय बैठका आयोजित केल्या.