Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर आरोग्य केंद्राकडून मडगाव पालिका मुख्याधिकारी आणि पशूवैद्यकीय रुग्णालय यांना सूचना

मडगाव, १८ एप्रिल (वार्ता.) : रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी उचित अधिकारिणी या नात्याने आवश्यक कृती करून त्याची माहिती तक्रारदाराला द्यावी, अशी सूचना नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वतीने मडगाव पालिकेचे साहाय्यक संचालक, पशूवैद्यकीय रुग्णालय, सोनसोडो आणि पालिका मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.

मडगाव परिसरासह सासष्टी तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कुत्र्यांना त्वचेचे आणि इतर अनेक प्रकारचे आजार आहेत. मडगाव पालिकेचा प्रभाग क्रमांक १६ कालकोंडा येथे तर ही समस्या पुष्कळ वाढली आहे. या कुत्र्यांमुळे माणसांनाही रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीद्वारे नजरेस आणून देण्यात आले आहे. हे कुत्रे अचानक वाहनचालकांच्या मागे धावून येत असल्याने अपघातही घडतात. या  प्रकरणी लक्ष घालून त्वरित योग्य कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या राजू विर्डीकर यांनी वरील अधिकारिणीकडे केली आहे.

संपादकीय भूमिका

अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?