रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित
रत्नागिरी – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला चालू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुतीतल्या पक्षांमधील जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही; मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे असलेली ही जागा यावर्षी भाजपने स्वत:कडे घेतली आहे.
मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ही जागा शिवसेनेने लढवली होती. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. २ वर्षांपूर्वी शिवसेनेचे १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले आणि भाजपशी युती केली होती. त्या वेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच थांबण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यावर्षी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. या जागेसाठी शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते.
मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट (दाखल) करणार आहेत. आता या मतदारसंघामध्ये महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.
किरण सामंत राणे यांचे प्रचाराचे काम करणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत
नारायण राणे उमेदवार असले, तरी किरण सामंत त्यांच्या प्रचाराचे काम करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी दिली. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचे आशीर्वाद !
उमेदवारी घोषित होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी नाणीज येथे जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि येत्या निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.