अखंड नामानुसंधानात रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती मीरा शंकर सामंत (वय ९० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता

रामनाथी (गोवा) – लहानपणापासून कर्मकांडाच्या माध्यमातून साधना करणे, मनापासून धर्माचरण करणे, धर्माचरणासाठी कठोर परिश्रम घेणे, इतरांना धर्माचरण करायला शिकवणे, ते करण्यास प्रोत्साहन देणे, साधनेची तीव्र तळमळ, सततचे नामानुसंधान आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्‍या मूळच्या सांगली येथील आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असणार्‍या श्रीमती मीरा शंकर सामंत (वय ९० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका अनौपचारिक भेटीत घोषित करण्यात आली. ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सामंत कुटुंबियांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. या वेळी श्रीमती मीरा शंकर सामंत यांचे पुत्र आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, स्नुषा आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत आणि त्यांच्या आई ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत, तसेच अन्य साधक उपस्थित होते. श्रीमती सामंतआजी यांच्या थोरल्या स्नुषा श्रीमती आरती प्रमोद सामंत, सौ. नंदिनी सामंत यांचे भाऊ श्री. अनिल सामंत आणि त्यांची पत्नी सौ. अदिती सामंत यांनीही भ्रमणभाषद्वारे या सोहळ्याचा आनंद घेतला.

सामंत कुटुंबियांशी संवाद साधत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती सामंतआजी यांचा दिनक्रम, तसेच त्यांचे साधनेचे प्रयत्न यांविषयी जाणून घेतले. सामंतआजी यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रथमपासून पाहिले असल्याने त्यांच्या सहवासात अनुभवलेल्या काही भावस्पर्शी क्षणांच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या या बोलण्यातून ‘मायेतील सर्व गोष्टींचा विसत पडतो; पण हदयात साठवलेल्या गुरूंच्या आठवणी मात्र अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत’, असे साधकांच्या लक्षात आले. त्यानंतर आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आणि आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासमवेतच्या भक्तीमय क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला. या गुरुभक्तीमय चर्चेच्या वेळी झालेला आनंद द्विगुणीत करत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती मीरा सामंतआजी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. त्या वेळी सर्वांना पुष्कळ आनंद झाला. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती सामंतआजींचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

श्रीमती मीरा सामंत यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याबद्दलचा भाव

१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घरी येणार आहेत’, असे श्रीमती मीरा सामंत यांना समजल्यावर त्यांनी लगेच सौ. नंदिनी सामंत यांना, ‘दारात रांगोळी काढली आहे का, ते बघ’, असे सांगितले. तेथे साधिका सौ. स्वाती शिंदे आल्यावर त्यांनाही आजींनी विचारले ‘दारात रांगोळी काढली आहे ना ?’ नंतर त्या म्हणाल्या की, ‘संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा खरा ।’ ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे गुरुच आपल्या घरी येत आहेत’, असा त्यांचा भाव होता.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला आल्या, तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, ‘माझी गुरुदेवांशी भेट झाली, तेव्हाही मी तुम्हाला शोधत होते; मात्र तुमची भेट झाली नाही.’

आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर श्रीमती सामंतआजी यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे कळल्यावर तुम्हाला काय वाटले ?’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सामंतआजी यांना विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला काही वाटले नाही. आनंद किंवा काहीच वाटले नाही. ‘ही स्थिती काय आहे ?’, मला ठाऊक नाही. पुण्याला असते (गोव्यात येण्याआधी सामंतआजी पुणे येथे वास्तव्याला होत्या.), तर साधनेतील सूत्रे कळली नसती. येथे आश्रमात आल्यामुळे साधकांकडून शिकायला मिळाले. शेवट खरंच गोड झाला. जे हवे ते मिळाले.’’

श्रीमती मीरा सामंत यांच्या कुटुंबियांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, श्रीमती मीरा सामंत (मध्यभागी) आणि आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

१. श्रीमती आरती प्रमोद सामंत (श्रीमती मीरा सामंत यांच्या थोरल्या स्नुषा)

गुढीपाडव्याच्या दिवशी ही आनंदवार्ता ऐकून पुष्कळ आनंद झाला. ही गुरूंची कृपा आहे. सासूबाई पुण्याला असतांना सतत नामस्मरण करण्यात मग्न असायच्या. त्या केवळ गरजेपुरते बोलायच्या. मला त्यांच्या अस्तित्वाने आनंद आणि एक प्रकारची शांती अनुभवायला मिळायची. त्यांच्या सहवासात माझ्या मनात इतर विचार यायचे नाहीत. मन निर्विचार व्हायचे.

२. आधुनिक वैद्या नंदिनी सामंत (श्रीमती मीरा सामंत यांच्या धाकट्या स्नुषा)

२ अ. आजींची इच्छा गुरुदेवांनी पूर्ण करणे : ‘गोव्याला आल्यानंतर कवळे येथील श्री शांतादुर्गादेवीचे दर्शन, तसेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भेट व्हायला हवी. माझा जीव असेपर्यंत या तिघांचे दर्शन घ्यायचे आहे’, अशी त्यांची (श्रीमती सामंतआजींची) इच्छा होती. गुरुदेवांनीच त्यांची ही इच्छा पूर्ण करून घेतली.

२ आ. मायेत न अडकणे : गुरुदेवांनी मला (सौ. नंदिनीताई यांना) साधना शिकवली; म्हणून मी साधना करत आहे. माझ्यापेक्षा त्या (सामंतआजी) स्वयंस्फूर्तीने साधना करत आहेत. विविध संत त्यांच्या जीवनात आले आहेत. माझ्या विवाहाला ३४ वर्षे झाली. तेव्हापासून मी पहात आहे की, त्या सतत नामात असतात. त्यांच्या बहिणीचा, भावांचा दूरभाष आला, तर त्या मला सांगायच्या, ‘त्यांना सांग की, मी आतापर्यंत पुष्कळ संसार केला. आता मला देवाबरोबर थोडा वेळ राहू दे.’

श्रीमती सुनंदा सामंत

२ इ. श्रीमती मीरा सामंत आणि श्रीमती सुनंदा सामंत यांच्यातील आध्यात्मिक नाते : त्या (श्रीमती मीरा सामंत) आणि माझी आई (श्रीमती सुनंदा सामंत) दोघी दिवसभर एकत्र असतात. त्यांचे दिवसभराचे वेळापत्रक ठरलेले आहे. सासूबाईंना गोव्यात येऊन ७ महिने झाले आहेत. या काळात साधना हा विषय सोडून त्या दोघी अन्य कुठल्याही विषयावर बोललेल्या नाहीत. त्या दोघींची नैसर्गिक वृत्तीच साधना करण्याची आहे. वयस्करांमध्ये एकप्रकारचा ठामपणा असतो; पण त्या दोघींमध्ये कुठल्याही तर्‍हेचे घर्षण नसते. वादविवाद, काहीतरी अडचण आणि मग त्यामुळे निर्माण होणारा तणाव असे काहीच नसते. त्या दोघी एकमेकींमध्ये फार अडकलेल्या नाहीत; मात्र त्या अलिप्तही नाहीत.