‘वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव झाला होता. ‘त्याप्रमाणे हा ब्रह्मोत्सव असेल’, असे वाटले आणि मला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. ब्रह्मोत्सवाला जातांना मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘मैदानात पोचण्यापूर्वी २ – ४ कि.मी. अंतरापासूनच चैतन्याच्या लाटा येत आहेत’, असे मला जाणवले.
२. ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी जाणवलेली सूत्रे
अ. मैदानातील नियोजन अगदी शिस्तबद्ध होते.
आ. सर्व साधकांमध्ये भाव जाणवत होता.
इ. ‘देवलोकात सभा भरवली, तर असेच दृश्य दिसत असावे’, असे मला वाटले.
३. ‘एकाच वेळी संत आणि गुरु यांना पहायला मिळणार’, या विचाराने कंठ दाटून येणे
कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांची बैठकव्यवस्था संतांच्या बैठकव्यवस्थेच्या मागे होती. मला एवढ्या संतांचे एकाच वेळी दर्शन होऊन त्यांच्या चैतन्याचा लाभ जवळून घेता आला. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. ‘गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) पहायला मिळणार’, या विचारानेच माझा कंठ दाटून येत होता. सगळा भक्तसागर गुरूंची वाट पहात होता.
४. लहानपणापासून श्रीकृष्णाची भक्ती करत असल्यामुळे श्रीकृष्ण भेटीची ओढ लागणे
मी लहानपणापासून श्रीकृष्णाच्या कथा आणि भगवद्गीता ऐकल्यामुळे इतर देवतांपेक्षा माझी श्रीकृष्णावर भक्ती आहे. माझ्यावर कधी काही वाईट प्रसंग आला किंवा काही अडचणी आल्या, तर माझा मावस भाऊ श्री. सागर निंबाळकर यांनी दिलेल्या कृष्णाच्या चित्राकडे सुख-दुःख व्यक्त करण्याची मला सवय होती. मी श्रीकृष्णाला अंतःकरणापासून हाक मारत असे; पण चित्रातील श्रीकृष्ण माझ्याशी बोलायचा नाही. तेव्हा मला वाटायचे, ‘माझी श्रीकृष्णाशी कधी भेट होणार ?’
५. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर त्यांच्या रूपात साक्षात् श्रीकृष्ण अवतरित झाला आहे’, असे वाटणे
सूत्रसंचालकांनी शंख वाजवण्यास सांगितला. त्या नादाच्या समवेत समोरचा पडदा उघडला. तेव्हा ‘गुरूंच्या रूपात साक्षात् श्रीकृष्ण आमच्या समोर अवतरित झाला आहे’, असे मला वाटले. द्वापरयुगात अर्जुनाला गीता सांगतांना ‘कृष्ण कसा दिसत असेल ? ईश्वराचे सगुण रूप म्हणजे काय ? ते कसे दिसते ?’, हे आज आम्हा सर्वांनाच ‘याची देही, याची डोळा’ बघता आले. ‘आपली पात्रता नसतांनाही ईश्वराने एवढा मोठा दिवस आपल्याला भेट दिला’, या विचाराने माझी भावजागृती झाली. माझ्यात अपराधीभावही होता आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. आपल्या डोळ्यांत पाणी असेल, तर गुरूंचे दर्शन कसे घेणार ? त्यामुळे सगळेच स्वतःला सावरत भावविभोर होऊन गुरूंना बघत होते. ते क्षण मला शब्दात मांडता येत नाहीत.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ मैदानात फिरत असतांना सर्वांचे दर्शन पूर्ण होईपर्यंत भावाश्रू वहाणे
गुरूंचा रथ मैदानात सर्व साधकांना त्यांचे दर्शन देण्यासाठी फिरत असतांना प.पू. गुरुदेव सर्व साधकांना हात जोडत होते. ते पाहून मला भावाश्रू अनावर झाले. दर्शन पूर्ण होईपर्यंत माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबत नव्हते. त्यानंतरही २ घंटे श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांसमोरच उभा होता. अगदी कार्यक्रम संपेपर्यंत माझा कंठ दाटला होता.
७. द्वापरयुगात श्रीकृष्णाने श्रीरामाच्या रूपात हनुमंताला दर्शन देणे, त्याप्रमाणेच कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना कृष्णरूपात येऊन भेटणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ, त्यांची वस्त्रे, पायांतील मोजड्या, डोक्यावर घातलेला मुकूट, बाजूला ठेवलेली गदा, हे सर्व पाहून ‘साक्षात् श्रीकृष्ण अवतरला आहे आणि त्याने आम्हा सर्वांना जवळून पहात स्मितहास्य केले’, असे वाटले. स्वतःला शारीरिक त्रास होत असूनही केवळ आम्हा साधकांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हे रूप धारण केले. द्वापरयुगात श्रीकृष्णाने प्रभु श्रीरामाच्या रूपात हनुमंताला दर्शन दिले होते, तसेच कलियुगात गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आपल्याला कृष्ण भेट करून दिली. आपण एवढ्या चुका करतो आणि आपले एवढे स्वभावदोष आहेत, तरीसुद्धा कृष्ण स्वतःहून भेटायला आला. ‘खरेच भगवंताचे मन किती मोठे आहे ! हे आपल्याला कधीच समजणार नाही’, असे मला वाटले. माझा उद्धार झाल्यासारखे वाटले. देवाने आपल्यासाठी अजून काय करायला हवे ?
८. ‘ब्रह्मोत्सव कधीच संपू नये’, असे वाटणे
ब्रह्मोत्सव पहाण्यास सर्व गोकुळनगरी जमली होती. गोप-गोपी नाचत गाणी म्हणत होते. तेथे साधक वाद्य वाजवत होते आणि देव पुष्पांचा वर्षाव करत होते. ‘हा क्षण कधी संपूच नये आणि तिथून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. गुरूंच्या चरणांमध्ये जी शांती आहे, ती कुठेच नाही.
९. ब्रह्मोत्सव झाल्यावर मनाची स्थिती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
९ अ. भावाच्या स्तरात वाढ होऊन प्रत्येक साधकाबद्दल कृतज्ञता आणि प्रीती वाटणे : ब्रह्मोत्सवाहून आल्यापासून मला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटत आहे. मागील अनेक वर्षांत मिळून जेवढी कृतज्ञता वाटली नसेल, तेवढी या २ – ३ दिवसांत वाटली. माझ्या भावाच्या स्तरातही पुष्कळ वाढ झाली. प्रत्येक साधकाबद्दल कृतज्ञता आणि प्रीती वाटू लागली आहे.
९ आ. भगवंतांनी सर्व साधकांना गुण-दोषांसह स्वीकारले आहे, हे लक्षात आल्यावर साधक आणि कुटुंबीय यांच्याविषयी प्रतिक्रिया न येणे : ब्रह्मोत्सव होण्याआधी मला साधक किंवा कुटुंबीय यांच्याविषयी प्रतिक्रिया येत होत्या. त्यांना इतरांचे स्वभावदोष लगेच दिसत असत आणि त्यांनी स्वत: काय पालट करावेत ?’, यावरच माझे लक्ष जात असे. ‘ब्रह्मोत्सवाला सहस्रो साधक आले होते. तेथे कुणी पूर्णवेळ साधना करणारे, कुणी साधनेत खंड पडलेले आणि अनेक स्वभावदोष असलेले साधक होते. हे सर्व भगवंताला दिसते, तरी त्याने सर्व साधकांना गुण-दोषांसह स्वीकारले असून त्यांना आपलेसे केले. त्यांची उन्नती होणारच आहे. प्रत्येक साधकाची गती केवळ ज्याच्या त्याच्या क्रियमाण करण्यानुसार अल्प-अधिक होईल एवढेच ! ‘एवढे सगळे असतांना आपण कुणी कसे वागावे ? आणि कोण किती पात्र आहे ? असे विचार करणे किती अयोग्य आहे’, याची मला प्रखरतेने जाणीव झाली.
९ इ. साधकांविषयी पूर्वग्रह जाऊन आपुलकी आणि प्रेम वाटणे : सर्व साधकांकडे पहातांना भगवंत (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) हात जोडतांना दिसला. तेव्हा ‘मी कुठे आहे आणि मला कुठे पोचायचे आहे ?’, हे समजले. तेव्हापासून मला प्रत्येक साधकाबद्दल आपुलकी आणि प्रेमच वाटत असून आता कुणाविषयीही पूर्वग्रह वाटत नाही. सर्वांना स्वीकारण्याची व्यापकता शिकून घ्यायला हवी. देव एवढा विनम्र आहे, तसेच आपणही विनम्र बनायला हवे. ‘कोण काय विचार करील ?’, असे न्यूनगंड न बाळगता सर्वांशी मनमोकळे वागता यायला हवे आणि त्यासाठी अहं अल्प करायला हवा.
९ ई. ब्रह्मोत्सवानंतर शांत वाटणे आणि भावजागृती होणे : ‘साक्षात् भगवंताने दर्शन दिल्यानंतर त्याच्याकडे अजून काही मागावे ?’, असे शेषच राहिलेले नाही. ब्रह्मोत्सव होऊन २ दिवस झाल्यानंतरही मला ‘नारायण नारायण’, असे म्हणणार्या साधिकांचा आवाज आणि संथपणे चाललेली श्रीकृष्णाची रथयात्रा आठवून शांती जाणवते आणि माझी भावजागृती होते.
९ उ. भगवंताने एकाच दिवसात सर्वकाही देणे : मला सोहळा अनुभवता आला. अनेक युगांमध्ये कधीतरी एखादा अवतार घेऊन भगवंत पृथ्वीवर येतो. त्याला साक्षात् पहाता आले. यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले ! ‘यापुढे साधकांना व्यावहारिक जीवनात कधी कितीही अडचणी आल्या, तरीही आपल्या नशिबाला दोष देऊन दुःखी होणे’, असे काही करता येणार नाही; कारण सर्वकाही एकाच दिवसात मिळाले. देवाने यापेक्षा मोठे द्यावे तरी काय ? आणि आपण मागावे तरी काय ?
‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’
– श्री. मिलिंद पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर. (१४.५.२०२३)
|