Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !

तेल अवीव (इस्रायल) – लेबेनॉनची आतंकवादी संघटना हिजबुल्लाने इस्रायलच्या पश्‍चिम किनार्‍यावरील अरब अल्-अरमशे या गावात असलेल्या बेदुइन भागावर क्षेपणास्रांचा मारा केला. ही क्षेपणास्त्रे थेट सामुदायिक केंद्रावर पडली. या आक्रमणात ११ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. हिजबुल्लाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे, असे इस्रायली संरक्षणदलाने म्हटले आहे.

गाझामधील निर्वासितांच्या शिबिरावर आक्रमण : १३ जण ठार !

मध्य गाझा येथील अल्-मगाझी निर्वासित शिबिरावर इस्रायली सैन्याने केलेल्या आक्रमणात ७ मुलांसह १३ जण ठार झाले असून २५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

इस्रायल इराणला प्रत्युत्तर देण्यावर ठाम !

इस्रायल इराणला क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यावर ठाम आहे. दुसरीकडे अमेरिकेनेही इराणवर कडक निर्बंध लादण्याची सिद्धता केली आहे. याचा अर्थ गाझामधील युद्ध आता मध्यपूर्वेत पसरणे निश्‍चित आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. असे असले, तरी सुनक यांनी इस्रायलला ब्रिटनच्या पाठिंब्याचा पुनरुच्चारही केला.