आगरा (उत्तरप्रदेश) – दयालबाग शैक्षणिक संस्थेतील बी.टेक.चा विद्यार्थी सिद्धांत गोविंद शर्मा याची सिकंदरा येथे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. तो त्याच्या ३ मित्रांसह येथे आला होता.
आवास विकास कॉलनीतील सेक्टर-७ येथील रहिवासी सिद्धांत गोविंद शर्मा (वय २४ वर्षे), कॉलनीतील शुभम गुप्ता, पुष्पांजली गार्डेनिया येथील रहिवासी शशांक राणा आणि अपर्णा प्रेम अपार्टमेंटमधील रहिवासी सिद्धांत राणा यांच्यासह शास्त्रीपूरम्मधील जेसीबी चौकात पोचले होते. मैदानावर उभे राहून ते चौघेही त्यांच्या भ्रमणभाषवर क्रिकेट सामना पहात होते. त्या वेळी ३ तरुण दुचाकीवरून आले. त्यांपैकी एकाने चौघांकडे पैसे मागितले. त्यास त्यांनी नकार दिला, तेव्हा त्यांनी चाकू काढला आणि सिद्धांतच्या पोटात वार केला. त्याने शर्मा याच्या मित्रांवरही आक्रमण केले आणि ते पळून गेले.
पोलीस अधीक्षक हरिपर्वत आदित्य सिंह म्हणाले की, चारही मित्र मेजवानीसाठी आले होते. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले जात आहे.