Election Commission X Post : निवडणूक आयोगाकडून ‘एक्स’ला ४ पोस्ट हटवण्याचा आदेश !

  • आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका !

  • हे कसले अभिव्यक्ती स्वातंत्र्य ? – ‘एक्स’

नवी देहली – भारतीय निवडणूक आयोगाने ‘एक्स’ला निवडणुकीशी संबंधित ४ पोस्ट्स काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेस, आम आदमी पक्ष, एन्. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पोस्टचा समावेश आहे. या पोस्ट्सनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे इतर पक्षांच्या नेत्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या आधारे राजकीय पक्षांवर टीका करू देत नाही, असे आयोगाने सांगितले. या ४ पोस्ट्स कोणत्या होत्या ? हे अद्याप कळू शकलेले नाही.

१. ‘एक्स’ने यावर स्पष्टीकरण देतांना म्हटले की, आम्ही पोस्ट काढून टाकत आहोत.  निवडणूक आयोगाच्या या कृतीशी आम्ही सहमत नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.

२. आस्थापनाने पुढे सांगितले की, आम्ही त्या ४ नेत्यांना पोस्ट काढून टाकण्यासंदर्भात कळवले असून पारदर्शकता राखण्यासाठी तसे आदेश प्रकाशित करत आहोत.

३. याआधी फेब्रुवारीमध्येही ‘एक्स’ने अशाच प्रकारची भूमिका घेतली होती. तेव्हा केंद्रशासनाने काही खाती आणि पोस्ट काढून टाकण्यास सांगितले होते.

४. डाव्या विचारसरणीचे जॅक डॉर्से आस्थापनाचे प्रमुख असतांना, म्हणजे वर्ष २०२१ मध्येही केंद्रशासनाने कथित शेतकरी आंदोलनातील शेतकर्‍यांची खाती हटवण्यास सांगितले होते. ती खाती खलिस्तानी आतंकवाद्यांशी संबंधित होती. त्या वेळी शासनाने त्यांची १ सहस्र २०० खाती, तसेच २५० पत्रकारांची खाती हटवण्याचा आदेश दिला होता.

५. आता जरी वास्तविक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत हिंदुत्वनिष्ठांच्या खात्यांवर बंदी आणण्यास विरोध करणारे इलॉन मस्क एक्सचे मालक असले, तरी आस्थापनाची यासंदर्भातील भूमिका पालटलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !
  • भारताच्या एका महत्त्वाच्या आणि घटनात्मक संस्थेवर टीका करणार्‍या विदेशी आस्थापनावर भारतात बंदी घातली पाहिजे, तरच इतर विदेशी आस्थापने वठणीवर येतील !