Mumbai HC Ram Navami : रामनवमीनिमित्तच्या यात्रांमुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या !

उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना आदेश !

मुंबई – रामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना दिला.

१. मागील रामनवमीच्या वेळी मालवणी येथील मुसलमानबहुल परिसरातून काढण्यात आलेल्या यात्रेच्या वेळी मशिदीसमोर नमाज चालू होते. मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात होते. या प्रकरणी न्यायालयात तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपिठाने उपरोक्त आदेश दिला.

२. ‘आम्ही कुणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही; परंतु कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून दक्षतेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कुणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

३. त्याच वेळी नियमांचा भंग होणार नाही, या आश्‍वासनाच्या आधारे आमदार टी. राजासिंह यांना मीरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास अनुमती दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले.

४. ‘रामनवमीला काढण्यात येणार्‍या यात्रांच्या मार्गात पालट करण्यात आला आहे का’, ते पहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर रामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या यात्रांच्या वेळी अनुचित घटना घडणार नाहीत, यादृष्टीने पोलीस सावध रहाणार असल्याचे आश्‍वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपिठाला दिले.