हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि क्षमता लक्षात घ्या !

हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे. याचा अर्थ जगातील मानव समाज हा सुविद्य आणि सुसंस्कृत करण्याची प्रतिज्ञा हिंदु धर्माने घेतली आहे, तसेच ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे हनन’ ही हिंदु धर्माची शिकवण आहे. ‘पौरूषत्वाचा याग करण्याचा षंढपणा करू नकोस’, अशी श्रीकृष्णाची आज्ञा आहे. या आज्ञेचे पालन करणारा हिंदू समाज आहे. अहिंसेला यथोचित मान देणारी हिंदु संस्कृती संस्कार करण्यात कुठेही कमी पडत नाही. असे असले, तरी आततायी लोकांना जीवनदान देणे, म्हणजे मानवी समाजाचे जीवन धोक्यात घालणे आहे. थोडक्यात हिंदु धर्म समन्वय साधण्यासाठी आपल्या अनुयायांना उद्युक्त् करतो.

 

१.  सत्य, न्याय आणि धर्म यांसाठी आग्रही भूमिका शिकवणारा भगवान श्रीकृष्ण !

‘आचार-विचार शुद्ध आणि पवित्र असले पाहिजेत’, असा आग्रह धरणारा हिंदु धर्म आहे. त्यासाठी प्रसंगी आग्रही भूमिका घेण्यास हिंदु धर्म मागे पुढे पहात नाही. करुणा आणि दया यांचे महत्त्व हिंदु धर्माने जाणले आहे. त्यांना हिंदु धर्म कमी लेखत नाही. तथापि ‘क्रौर्य, दुष्टता, दुराचार यांना दया दाखवायची नाही’, अशी शिकवण देणारा हिंदु धर्म आहे. त्यासाठी तो प्रसंगानुरूप आग्रही भूमिका बजावत असतो.

‘सत्यासाठी, न्यायासाठी आणि धर्मासाठी स्वतःचे वचनभंग करावे लागले, तरी चालेल; पण असत्य, अन्याय अन् अधर्म यांचा नाश केलाच पाहिजे’, असा वस्तूपाठ देणारा भगवान श्रीकृष्ण हातात सुदर्शन चक्र घेऊन रणांगणात उभा आहे. त्याने ‘हातात शस्त्र धरणार नाही’, अशी महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी प्रतिज्ञा केली होती; पण जेव्हा सत्य, न्याय आणि धर्म संकटात सापडलेले पहाताच श्रीकृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडली. ही गोष्ट हिंदू समाज कधीही विसरला नाही, विसरत नाही आणि विसरणार नाही. रामायण, महाभारत यांतील अशा घटनांचा विपरीत अर्थ लावून हिंदूंचे क्षात्रतेज नष्ट करण्याचा अनेक वार प्रयत्न करण्यात आला. असा प्रयत्न करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्ण हे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांची आराध्य दैवते आहेत.

श्री. दुर्गेश परुळकर

२. प्रतिशोध आणि संरक्षण यांसाठी हाती शस्त्र घेऊन लढण्याची आज्ञा देणारा हिंदु धर्म !

श्रीराम

हिंदु धर्म केवळ संख्याबळाला महत्त्व देत नाही, तर संख्याबळासह गुणबळ वाढवण्याकडे अधिक लक्ष देत असतो. ‘गुणांचे संवर्धन हा मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा पाया आहे’, असा सिद्धांत हिंदु धर्माने प्रस्थापित केला आहे. हिंदु धर्म प्रभु श्रीरामाला ‘आदर्श पुरुष’ म्हणून पूजतो; कारण गौतम भार्या अहिल्या हिच्या चरणावर माथा टेकतो. रावणाला मारण्यापूर्वी महातपस्विनी असलेल्या शबरीदेवीचे दर्शन घेऊन तिची इच्छा पूर्ण करतो; पण त्याच वेळी ताटिका आणि शूर्पणखा यांच्यासारख्या दुष्ट पापी दुराचारी राक्षसिणींना शासन देतांना त्याचे मन जराही कचरत नाही. पित्याचे वचन पाळण्यासाठी राजवस्त्रांचा त्याग करून यतीवेश धारण करतांना त्याचे मन जराही विचलित होत नाही. सीतामाईची मुक्तता करण्यासाठी श्रीरामाने रावणाचा वध केला नाही, तर रावणाने रघुकुलाचा उपमर्द केला. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी श्रीराम आणि वानर यांनी लंकेवर चढाई केली. साप जेव्हा माणसाला डसतो, तेव्हा माणसाचे रक्त पिण्याच्या हेतूने तो डसत नाही, तर त्याच्या शेपटीवर पाय दिला; म्हणून त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तो डसतो. याचा अर्थ आपली श्रद्धास्थाने, संस्कृती आणि राष्ट्र-धर्म यांवर जर कुणी आक्रमण करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या संरक्षणार्थ प्राणाची बाजी लावून त्यांचे रक्षण करण्यासाठी हाती शस्त्र घेऊन लढण्याची आज्ञा अखिल हिंदु राष्ट्राला हिंदु धर्म देत आहे.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट केलेला हिंदु आणि मुसलमान समाज यांच्यातील भेद

स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदु आणि मुसलमान समाज यांच्यातील भेद स्पष्ट करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘‘हिंदु मुसलमानांसारखा वेडगळ कडवा नाही; पण हिंदु कडवा आहे. हिंदु मुसलमानासारखा धर्म उन्मत्त वीर नाही; पण हिंदु धर्मवीर आहे. हिंदु धर्मवीर नसता, तर या जीवनाच्या कलहात आजपर्यंत तो जगला नसता.’’

४. स्त्रियांसह सर्वांना सन्मानाची वागणूक देणारा हिंदु धर्म !

मुसलमानांचा धर्म त्यांना सहिष्णुतेची शिकवण देत नाही. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दुसर्‍यांची हत्या करण्याची आवश्यकता नसते, तसेच स्वतःचे श्रेष्ठत्व करण्यासाठी दुसर्‍याला नष्ट करावे लागत नाही. ‘आपण प्रामाणिकपणाने जीवन जगावे आणि कष्टाने स्वतःचा उत्कर्ष साधावा’, हा संस्कार आणि विचार यांवर हिंदु धर्माची श्रद्धा आहे. ‘निरपराध्याला मारणे, हे पाप आणि अधम कृत्य आहे’, असे मानणारा हिंदु धर्म आहे. परस्त्री मातेसमान मानून तिला सन्मानाची वागणूक देणारा संस्कार हिंदु धर्म हिंदूंवर करतो. हिंदु धर्मातील रक्षाबंधन आणि भाऊबीज हे सण त्याचेच प्रतीक आहे.

५. राष्ट्र-धर्मासाठी बलीदान देण्याविषयी हिंदु धर्माची शिकवण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

राष्ट्ररक्षणासाठी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि तारुण्यात प्रवेश केलेल्या अनेक विरांनी मृत्यूला कवटाळले आहे, तसेच हिंदु धर्मासाठी गुरुगोविंद सिंग यांच्या मुलांनी बालवयातच आत्मबलीदान केले. तोच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवला. भारतमातेसाठी प्राण अर्पण करणार्‍या विरांनी भारतमातेला सांगितले, ‘हे भारतमाते, आमच्या या वीरमरणाचा शोक करू नकोस. थोडा धीर धर. पुन्हा ९ मासांत आम्ही तुझ्याच उदरी जन्म घेऊन तुझ्या सेवेसाठी सज्ज होऊ.’ राष्ट्र-धर्मासाठी बलीदान केल्यावर अप्सरांचा उपभोग घेता येतो’, अशी शिकवण हिंदु धर्म देत नाही, हे वरील उदाहरणावरून लक्षात येण्यास कोणतीही अडचण नसावी.

६. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घ्या !

हिंदु धर्म उपभोगाची लालसा निर्माण करत नाही, तर त्यागाची लालसा निर्माण करतो. ही गोष्ट जर नेमकेपणाने जाणली, तर हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता रहाणार नाही. तथापि अकारण हिंदु धर्माला दूषण देणार्‍यांसाठी एवढेच सांगणे आहे की, त्यांनी हिंदु धर्म नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, म्हणजे हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि क्षमता सुद्धा ध्यानात येईल.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (२२.३.२०२४)