१ सहस्र ५६६ घरांची पडझड !
अमरावती – हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी उपस्थिती लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणारा अवेळी पाऊस आणि गारपिटी यांनी अक्षरक्ष: शेतकरी हवालदिल झाले आहेत. २ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात तब्बल ५५ सहस्र ५९६ हेक्टरवरील शेतपिकांची हानी झाली आहे, तर १ सहस्र ५६६ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहे.
दुसरीकडे विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणासह इतरत्रही दमदार पावसासह विजांचा कडकडाट आणि ३०-६० प्रति घंटे सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला आहे. पुढील २ दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम रहाणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
बुलढाणा येथील अनेक भागात सलग चौथ्या दिवशीही वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाली आहे. यात जिल्ह्यातील मेहकर, मोताळा तालुक्यात गारपीटीमुळे शेतमालाची मोठी हानी झाली आहे. यात संत्रा, तीळ, लिंबू, गहू, ज्वारी, भाजीपाला, केळी, आंबा आणि पपई या पिकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या २ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गारपीट आणि वादळी वार्यामुळे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. टरबूज, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाला या पिकांची अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.