पुणे येथील ‘ससून’मध्ये मृत रुग्णाच्या शरिरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा असल्याचे समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट !

रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

पुणे – वेल्हा या गावातील ३० वर्षीय सागर रेणुसे याचा १७ मार्च या दिवशी पुणे येथील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील अतीदक्षता विभागांमध्ये उंदीर चावून मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. संबंधित आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करण्याची लेखी मागणीही नातेवाइकांनी केली होती. त्याविषयी चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ‘मृत रुग्णाच्या शरिरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा दिसून आल्या’, अशी माहिती नोंद करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील दोषींवर ससून रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (हा प्रकार म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळणे ! हा प्रकार रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)

नेमलेल्या ३ सदस्यीय समितीने ससून रुग्णालयास भेट दिली. रुग्णाच्या शरिरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा असून शवविच्छेदन अहवालामध्येही याचा उल्लेख करण्यात आला होता. पडताळणीच्या वेळी रुग्णालय प्रशासनाने त्यास सहमती दर्शवली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानंतर रुग्णालयामध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ (डास, झुरळ मारण्यासाठीचे औषध फवारणे म्हणजे ‘पेस्ट कंट्रोल’) करण्यासाठी नेमलेल्या आस्थापनाची चौकशी चालू आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले की, समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांनुसार ससून प्रशासनातील कुणी दोषी आढळल्यास कारवाईसाठी राज्य सरकारकडे शिफारस करण्यात येईल.

संपादकीय भूमिका :

  • अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !
  • संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली तरच अशा समित्या नेमल्याचा पीडितांना लाभ होईल ! अतीदक्षता विभागांमध्ये परिचारक आणि कर्मचारी हे २४ घंटे असतांना असे प्रकार घडतातच कसे ?