आंब्याची निर्यात चालू !

निफाड (नाशिक) – लासलगाव येथील भाभा अणूसंशोधन केंद्रात विकिरण प्रक्रिया (जंतू नष्ट करण्याची किरणोत्सर्गाची प्रक्रिया) केलेल्या हापूस आंब्याची अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे निर्यात चालू झाली आहे. या वर्षी एक सहस्र टन आंब्यांच्या निर्यातीचे उद्दिष्ट आहे. उत्पादन अल्प आहे. पुढील दोन ते अडीच महिने ही निर्यात केली जाणार आहे. आतापर्यंत १४० टन आंबा हा अमेरिकेला निर्यात झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया आदी देशांत हापूसची मागणी आहे. या वर्षी मुंबई विमानतळावरून बुकिंग मिळत नसल्याने भाग्यनगर आणि बेंगळुरू येथील हवाई सेवांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आंबे पोचण्यास २ ते ३ दिवस विलंब होत आहे.

अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. प्रक्रिया केलेला आंबा सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलीस, न्यू जर्सी, ह्युस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरात प्रक्रिया केलेला आंबा पाठवण्यात येत आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण देत युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणार्‍या हापूस आंब्यावर २०१३ या वर्षी बंदी घातली होती. पण विकिरण प्रक्रियेमुळे अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन झाल्याने वर्ष २००७ पासून लासलगाव येथून प्रक्रिया केलेल्या हापूसची परदेशवारी चालू आहे.