अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न आवडणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. जुने ग्रंथ स्टँड निकामी झाल्यामुळे  ग्रंथ प्रदर्शन लावण्यास अडचणी येणे

‘वर्ष २०१० मध्ये मी दक्षिण भारतात प्रचारसेवा करत होतो. धर्मप्रचारांतर्गत साधक ग्रंथप्रदर्शन लावत असत. जुने ग्रंथ-स्टँड निकामी झाल्यामुळे साधकांना ग्रंथप्रदर्शन लावायला अडचण येत होती. त्यावर उपाय म्हणून काही साधक ग्रंथप्रदर्शन लावायला जातांना ‘प्लास्टिकचे हलके सहज उचलता येणारे आणि दुमडून ठेवता येऊ शकेल’, असे मोठे पटल घेऊन जात किंवा लाकडाची फळी घेऊन त्यावर ग्रंथ प्रदर्शन लावत असत. काही ठिकाणी ओटा असेल, तर त्यावर ग्रंथप्रदर्शन लावत असत.

२. ग्रंथ वितरणासाठी स्टँड बनवण्याची संकल्पना मनात येणे आणि त्यानुसार एका साधकाला स्टँड सिद्ध करण्यास सांगणे

माझ्या मनात विचार आला, ‘ग्रंथप्रदर्शनासाठी एखादा वजनाने हलका, लाकडाचा ग्रंथ स्टँड बनवावा. त्यामुळे साधकांना ग्रंथप्रदर्शन लावायला सोपे जाईल.’ कर्नाटकात मोठ्या प्रवचनांसाठी धर्मरथावर आलेल्या एका साधकांना मी ग्रंथ स्टँडची संकल्पना सांगितली. त्यांनी लगेच तसा ग्रंथ स्टँड बनवायला आरंभ केला.

३. साधकाने आवश्यकतेनुसार कप्पे बनवून आकर्षक ग्रंथ स्टँड सिद्ध करणे

त्या साधकांनी ग्रंथ स्टँड बनवतांना मी सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते पालट केले. काही साधकांनी त्यांना काही चांगल्या गोष्टी सुचवल्या. त्यानुसार श्री. पाडळे यांनी एक अंतिम ग्रंथ स्टँड बनवला. ग्रंथ आणि लघुग्रंथ ठेवण्यासाठी कप्पे, प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने यांच्या ध्वनीफिती (कॅसेट) ठेवण्यासाठी वेगळा कप्पा बनवला होता. दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ ठेवण्यासाठीही वेगळी व्यवस्था केली होती. तो स्टँड उघड-बंद करायलाही अतिशय सोपा आणि हलका होता. त्याला पिवळा रंग दिल्यानंतर तो फारच आकर्षक दिसत होता.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ग्रंथ स्टँड आवडणे आणि त्यांनी तो शिबिरात दाखवायला सांगणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकांचे शिबिर होते. तिकडे जातांना मी तो ग्रंथ स्टँड समवेत घेऊन गेलो होतो. प.पू. डॉक्टरांना एका साधकाच्या माध्यमातून तो ग्रंथ स्टँड दाखवला. त्यांनी मला निरोप पाठवला, ‘‘छान आहे, शिबिरात दाखवा.’’ मलाही तो ग्रंथ स्टँड पुष्कळ आवडला होता. मी तो ग्रंथ स्टँड शिबिरामध्ये साधकांना दाखवला आणि ‘ग्रंथ स्टँड किती चांगला अन् हलका आहे’, हे त्याच्या वैशिष्ट्यांसह सांगून साधकांनी त्याची मागणी द्यावी’, असे सांगितले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ग्रंथ स्टँडची आवश्यकता नाही’, असा निरोप दिल्याचे ऐकल्यावर वाईट वाटणे

शिबिर झाल्यानंतर मी साधकाच्या माध्यमातून गुरुदेवांना ‘‘ग्रंथ स्टँडच्या मागणीविषयी कसे करावे ?’’, असे विचारले, तेव्हा त्यांनी मला निरोप दिला, ‘‘आपल्याला ग्रंथ स्टँडची आवश्यकता नाही.’’ ते ऐकल्यावर मला पुष्कळ वाईट वाटले. खरे तर मला ते सहज स्वीकारता यायला हवे होते; परंतु मला ते लगेच स्वीकारता आले नाही.

६. कर्तेपणा आणि कौतुक यांमुळे मन सुखावणे

यावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘तो ग्रंथ स्टँड बनवण्यासाठी मी पुष्कळ मेहनत घेतली आहे आणि बरेच प्रयत्न करून त्याची रचना चांगली केली आहे’, असे कर्तेपणाचे विचार माझ्या मनात अधिक प्रमाणात होते.’ सर्व साधकांनीही त्या ग्रंथ स्टँडचे पुष्कळ कौतुक केल्यामुळे माझे मन सुखावले होते.

७. अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती देवाला न आवडणे

‘आता त्या प्रकारचे नवीन स्टँड बनवणार नाहीत’, असे मी साधकांकडून ऐकले. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात आले, ‘देवाने मला सुचवले आणि त्यानेच करून घेतले’, असा कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात नव्हता. यातून माझ्या लक्षात आले, ‘साधकांनी स्वतःकडे कर्तेपणा घेतलेला देवाला आवडत नाही. अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी श्री गुरूंना ती आवडत नाही.’

८. सर्वांतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अहंभाव वाढण्यापासून वाचवणे

नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती; परंतु ‘सर्वांतर्यामी गुरु शिष्याची हानी होऊ देत नाहीत’, हे या प्रसंगातून माझ्या लक्षात आले. गुरुदेवांच्या या कृपेविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

९. प्रसंग घडून गेल्यावर साधकाची चूक सांगितल्याने त्याला त्याच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेची पूर्ण जाणीव होणे

काही साधकांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो, ‘आरंभी मी गुरुदेवांना साधकाच्या माध्यमातून ग्रंथ स्टँड दाखवला, तेव्हाच ‘त्यांनी ग्रंथ स्टँड बनवायला नको’, असे का सांगितले नाही ?’ त्याचे उत्तर असे आहे, ‘तेव्हाच त्यांनी मला ‘आपण ग्रंथ स्टँड बनवायला नको’, असे सांगितले असते, तर माझ्यातील अहंचे पैलू पूर्णपणे माझ्या लक्षात आले नसते. नंतर त्यावर माझे जसे चिंतन झाले, तसे झाले नसते. ‘माझ्यातील कर्तेपणा किती तीव्र आहे ?’, हेही मला कळले नसते. प्रत्यक्ष प्रसंग घडून गेल्यामुळे मला माझ्या अहंच्या काही पैलूंचे योग्य प्रकारे आकलन होण्यास साहाय्य झाले.’

आताही काही साधक विचारतात, ‘तुम्ही आता मला ही चूक सांगत आहात, ती आधी का सांगितली नाही ?’, याचे उत्तर वरील विवेचनातून त्यांच्या लक्षात येऊ शकते.

१०. कर्तेपणाचा त्याग करून सेवा करण्याचे महत्त्व

काही साधक पुष्कळ सेवा करतात; परंतु ‘माझ्यामुळे सेवा होत आहे, मी चांगली सेवा करतो’, अशा प्रकारचे कर्तेपणाचे विचार त्यांच्या मनात असतात. त्याचप्रमाणे ‘आपण केलेल्या सेवेचे इतरांनी कौतुक करावे’, असेही त्यांना वाटत असते. असे ‘अहं’चे विचार मनात असल्यास ती सेवा ईश्वरचरणी रुजू होत नाही. ‘कर्ता-करविता भगवंतच आहे’, असा भाव ठेवून आणि कर्तेपणा ईश्वराच्या चरणी अर्पण करून कृतज्ञताभावात राहिल्यास ती सेवा ईश्वरचरणी पोचते. ‘कृतज्ञताभावाने केलेल्या सेवेतून साधना होते’, हे या प्रसंगातून मला शिकता आले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !     (क्रमशः पुढच्या रविवारी)

इदं न मम ।’ (हे लिखाण माझे नाही !)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१२.२०२३)