पाकिस्तानी सैन्याचा पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पोलिसांना बेदम चोपले !

पाक सैन्याने प्रकरण दडपले

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान एकीकडे आर्थिक डबघाईला पोचला असून दुसरीकडे तेथील सैन्य आणि पोलीस यांच्यात शत्रुत्वाची भावना असल्याचे दिसू येत आहे. या संदर्भात सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात पाकिस्तानी सैन्याने पंजाब पोलिसांच्या भवालनगर येथील मदारिसा पोलीस ठाण्यावर आक्रमण करून तेथील पोलिसांना बेदम चोपल्याचे दिसून येत आहे.

सौजन्य Defence Detective

पोलिसांनी एका सैनिकाच्या भावाकडून अवैध शस्त्रे जप्त करून त्याला अटक केली होती. यामुळे सुमारे ४५ सैनिकांनी पोलीस ठाण्यावर चाल करून तेथील प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याला आणि अधिकार्‍यांना मारहाण करून तोडफोड केली. तसेच तेथे अटकेत असलेल्या सैन्याधिकार्‍याच्या नातेवाइकांची सुटका केली. या वेळी अन्य आरोपही पळून गेले.

सैनिकांवर गुन्हा नोंद नाही !

या घटनेचे वृत्त पाकमधील प्रसारमाध्यमांना दडपण्यास सैन्याने भाग पाडल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच ते पाकमध्ये प्रसारित झाले नाही. या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी काही पोलिसांनी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका 

ही आहे पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती उघड करणारी आणखी एक घटना !