स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

पुणे – शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सविस्तर सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे. १० एप्रिलला रहिवासी, कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज मीना, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल, वैद्यकीय अधिकारी कल्पना बळीवंत, मुख्य पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे आदी उपस्थित होते.

या वेळी वायू प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे आणि हवेच्या गुणवत्तेचे प्रश्न प्रभावीपणे हाताळणे यांसाठी तज्ञांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. तसेच ‘एअर फिल्टरेशन सिस्टीम’ ९९ टक्क्यांपर्यंत कार्यक्षम असण्यासाठी आणि उत्सर्जन नियंत्रण प्रणालीच्या संपूर्ण स्वयंचलनासाठीही आवाहन करण्यात आले. स्मशानभूमीच्या वापराच्या पद्धती समजून घेण्यासाठी आणि विद्यमान प्रदूषण नियंत्रण उपायांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी तपशीलवार सर्वेक्षण करण्यावर सर्वांचे एकमत झाले. स्मशानभूमीच्या वापरासाठी ‘ऑनलाइन पास प्रणाली’च्या कल्पनेवर चर्चा करण्यात आली. वैकुंठ स्मशानभूमीत पार्किंग, पाणीपुरवठा आणि अंत्यसंस्कार सेवा पर्याय यांसारख्या स्मशानभूमीतील पायाभूत सुविधा वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘प्रतीक्षा यादी’

‘प्रतीक्षा यादी’ म्हणजेच माहिती प्रदर्शित करणे जेणेकरून अंत्यसंस्कार वेगळ्या ठिकाणीही करता येतील. वैकुंठ स्मशानभूमीजवळील रहिवाशांच्या निरीक्षणानुसार स्मशानभूमीत अधिक कठोर मानकांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे, इतर शहरांमध्ये जेथे अल्प लाकूड वापरले जाते, उत्सर्जन अल्प होते, अशा पर्यावरणपूरक पद्धती प्रचलित असायला हव्यात. धूर आणि प्रदूषक अल्प करण्यासाठी ‘हायब्रीड’ किंवा ‘इलेक्ट्रिक’ पर्यायांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. यावर मीना यांनी सांगितले की, सर्वेक्षण करून वायू प्रदूषणाचा अहवाल सिद्ध करण्यास सांगितले आहे. लोकांना इतर स्मशानभूमींचाही वापर करण्याच्या सूचना केल्या जातील.