परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेल्या रामनाथी आश्रमातील सौ. छाया नाफडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘माझा संकलनाची सेवा शिकण्याच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात रहाणार्‍या सौ. छाया नाफडेकाकू (वय ६३ वर्षे) यांच्याशी संपर्क आला. नंतर मी काही दिवस रामनाथी आश्रमात रहात असतांना मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. छाया विवेक नाफडे

१. प्रेमभाव आणि इतरांचा विचार

अ. सौ. नाफडेकाकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्या नेहमी सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात. त्यांचे सर्वांकडे लक्ष असते. एकदा आईला (सौ. सुजाता रेणके यांना) आश्रमात न्याहारी करण्यासाठी उशीर झाला आणि न्याहारी संपली होती. पुढच्या वेळी असे होऊ नये; म्हणून त्यांनी आईसाठी आठवणीने न्याहारी काढून ठेवली आणि ‘‘प्रतिदिन तुमच्यासाठी न्याहारी ठेवत जाईन’’, असे आईला म्हणाल्या.

आ. मी प्राथमिक संकलन केलेल्या धारिका पडताळण्यासाठी त्यांनी मला त्यांच्या सेवेतून पुरेसा वेळ दिला. त्यासाठी त्या कधीच ‘नाही’ म्हणाल्या नाहीत. मी सेवा शिकावी, यासाठी त्यांनी मला सर्वतोपरी साहाय्य केले.

२. नियोजनबद्धता आणि वक्तशीरपणा

सौ. दीपा औंधकर

काकू प्रत्येक गोष्ट ठरवलेल्या वेळेत करतात. त्यांचे दिवसभराचे नियोजन ठरलेले असते. त्याप्रमाणेच त्या त्यांची सेवा आणि नामजपादी उपाय करतात. त्यामुळे त्यांचा अनावश्यक वेळ गेल्याचे मी पाहिले नाही.

३. कर्तेपणा नसणे

एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही अंतिम संकलन करतांना कसा विचार करता ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शरणागती ठेऊन प्रार्थना केल्यावर देव आपोआप सुचवतो. आपल्याला काही करावे लागत नाही.’’

४. तत्त्वनिष्ठ

काकूंनी संकलन सेवा शिकवतांना अनेक वेळा माझ्या चुका सांगितल्या; पण त्या वेळी त्यांना माझा राग आला नाही. त्यांनी तत्त्वनिष्ठ राहून माझ्या चुका सुधारण्यासाठी मला साहाय्य केले. एकदा मी माझी मुलगी कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने केलेल्या नृत्यातील मुद्रांच्या अभ्यासाच्या धारिका संकलन करत होते. त्या वेळी मला अनेक शंका असायच्या. तेव्हा काकूंनी प्रत्येक वेळी माझ्या शंकांचे निरसन केले आणि ‘‘स्वतःच्या मुलीच्या धारिका आहेत; म्हणून भावनाशील न होता तत्त्वनिष्ठ राहून संकलन कर’’, असे सांगून त्यांनी मला माझ्या ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषाची जाणीव करून दिली. त्या वेळी ‘देवच काकूंच्या माध्यमातून मला शिकवत आहे’, असे मला वाटले.

५. साधनेचे गांभीर्य

काकूंना आध्यात्मिक त्रासामुळे नामजपादी उपायांचे घंटे अधिक आहेत. काकू उपायांच्या वेळा पूर्ण करूनच रात्री झोपतात. इतके घंटे उपाय असूनही त्या उपायांच्या वेळेत नेहमी उत्साही दिसतात. उपायांना बसल्यावर त्यांना झोप आल्याचे मी पाहिले नाही.

६. सेवेची तळमळ

अ. काकूंकडे अनेक वेळा तातडीच्याच सेवा असतात. त्यांना त्या सेवा पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ द्यायचा असल्यास त्या पहाटे ४ वाजता उठून सेवा पूर्ण करतात.

आ. संकलनासाठी आलेल्या धारिकेत एखादी शंका असेल, तर त्या सगळे प्रयत्न करून शंकेचे निरसन करून घेतात आणि धारिका अंतिम करतात. ‘धारिका पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?’, याचे बारकावे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रति भाव आणि श्रद्धा

अ. काकू संकलनातील बारकावे सांगतांना, ‘त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले आहे’, याविषयी नेहमी कृतज्ञताभावाने सांगतात.

आ. काकू परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली आणि शिकवलेली प्रत्येक कृती भावपूर्ण करतात. त्या वेळी त्या बुद्धीचा अडथळा आणत नाहीत.

हे गुरुदेवा, तुमच्या कृपेमळे मला काकूंकडून संकलनाची सेवा शिकण्याची संधी मिळाली, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे आणि ‘काकूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक