‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) २७.५.२०२३ या दिवशी गोव्यामध्ये झालेल्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२०’ परिषदेच्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आम्हाला नृत्य करण्याची आपण दिलेली संधी इतकी मोठी होती की, याविषयी शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणे अशक्यच आहे. हे गुरुदेवा, आम्हाला काही येत नसूनही आपण आम्हाला ही नृत्यसेवेची संधी दिलीत. नारायणस्वरूप गुरुदेवा, ही नृत्य सेवा करतांना आम्हाला अनेक नवीन पैलू शिकायला मिळाले. ते आपल्या चरणी अर्पण करतो.
१. नृत्यासाठीचे गीत समजल्यावर ते स्वीकारण्यात संघर्ष होणे
‘नृत्यासाठी ‘एकला चलो रे’ हे बंगाली गीत निवडले होते. त्या वेळी मला आणि कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिला ते गीत स्वीकारण्यासाठी संघर्ष झाला; कारण ‘एका बंगाली गीतावर शास्त्रीय नृत्य, मुद्रा आणि पदन्यास कसा होऊ शकतो ?’, असे आम्हाला वाटले. त्यानंतर श्री. शॉन क्लार्क (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५३ वर्षे) आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी त्या कार्यक्रमाविषयी काही सूत्रे सांगितली आणि ‘हे गाणे का निवडले ?’, याविषयीही आम्हाला सांगितले. त्यानंतर मी आणि शर्वरीने या गीतावर नृत्य बसवण्याचे ठरवले. तेव्हा देवाच्या कृपेने आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
२. ‘एका ठराविक गीतावरच नृत्य करायचे आहे’, ही स्वेच्छाही नको’, हे देवाने शिकवणे
या गीतावर नृत्य केल्यामुळे आम्हाला ‘अन्य भाषेतील गीतावर नृत्य कसे बसवायला पाहिजे ?’, नृत्याचे गीत बंगाली भाषेत असल्याने ते समजून त्याचा अर्थ नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत कसा पोचवता येईल ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले. त्या समवेत ‘आम्हाला एका ठराविक गीतावरच नृत्य करायचे आहे’, ही स्वेच्छाही नको’, हे देवाने शिकवले.
३. नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभूती
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर काही रचना सुचणे आणि ‘त्यांचे लक्ष असून तेच गीतावर नृत्य बसवून घेत आहेत’, ही जाणीव असणे : प्रारंभी नृत्य बसवतांना आम्ही गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) शरणागतीने प्रार्थना करून सरावाला आरंभ केला. तेव्हा आम्हाला नृत्यातील काही रचना सुचू लागल्या. ‘एखाद्या कडव्याला मध्येच काय बसवले पाहिजे ?’, हे कळत नसतांना प.पू. डॉक्टरांना संपूर्ण शरण गेल्यावर लगेच सुचायचे. आम्हाला ‘गुरुदेवांचे आपल्याकडे लक्ष आहे आणि तेच गीतावर नृत्य बसवून घेत आहेत’, याची जाणीव असायची.
३ आ. ‘जीवनात कितीही संकटे आली, तरी तुम्ही पुढे पुढे जात रहा !’, असा गीताचा सुंदर अर्थ असणे : नृत्य करतांना आम्ही त्याला पुढीलप्रकारे भावाची जोड दिली, ‘आपलेही जीवन किती अंधकारमय होते; परंतु जसे परात्पर गुरुदेव आपल्या जीवनात आले, तसा सर्व अंधकार दूर होऊन गुरूंनी आपल्याला मोक्षाच्या दिशेने पुढे नेले. जेव्हा आपल्याशी कुणी बोलत नव्हते, तेव्हा गुरुदेवच आपल्याशी बोलले आणि त्यांनी आपल्याला बोलके केले. जेव्हा सर्वांनी पाठ फिरवली, तेव्हा गुरुदेवांनी आपल्याला त्यांचा हात दिला आणि आपल्याला संकटातून बाहेर काढले. ‘जीवनात कितीही संकटे आली, तरी तुम्ही पुढे पुढे जात रहा !’, असा या गीताचा सुंदर अर्थ आहे.
३ इ. या गीताच्या माध्यमातून ‘मनात असणारा भाव महत्त्वाचा असून तो काेणत्याही गीतावर अवलंबून रहात नाही !’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे : आपल्या जीवनात प्रारब्धामुळे अनेक वादळे आली; परंतु गुरुदेवांनी नेहमी आधार देऊन आपल्याला पुढे पुढेच नेले. आपल्या पायात संकटस्वरूपी कितीही काटे टोचले, तरी गुरुदेवांच्या कृपेने आपण त्यावर चालू शकलो आणि आता त्याचीच पुष्पे झाली आहेत.’ या गीताचा आम्ही अशा प्रकारे आध्यात्मिक आणि भाव यांच्या स्तरांवर सराव करू लागलो. ‘ज्या गीतामुळे आमच्या मनाचा संघर्ष होत होता, त्याच गीतावर नृत्य करतांना आता इतका भाव कसा जागृत होत आहे ?’, याचे आम्हालाच पुष्कळ आश्चर्य वाटायचे. यातून गुरुदेवांनी शिकवले की, ‘आपल्या मनात असणारा भाव महत्त्वाचा आहे. कोणत्याही गीतावर आपला भाव अवलंबून रहात नाही !
४. नृत्यसेवा झाल्यानंतर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेले कृतज्ञतापुष्प !
‘नृत्यसेवा झाल्यानंतर आणि मध्ये मध्ये गुरुदेवांचे स्मरण होऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली, ‘हे कृपाघना गुरुदेवा, कदाचित् आमच्यासारख्या पामर जिवांना ‘आपण आमच्यावर किती कृपा करत आहात ?’, याची जाणीवही नसेल; परंतु ‘आपल्यामुळे आम्हाला एवढी मोठी संधी मिळाली’, यासाठी आमचे मन सतत कृतज्ञताभावात आणि शरणागतभावातच राहू दे. आपण कृपाळू परमेश्वरच आहात. आमच्यामध्ये एवढे स्वभावदोष आणि अहं असूनही आपण आम्हाला ही संधी दिलीत, यात आमचे श्रेय काहीच नसून सर्वकाही तुम्हीच करून घेतलेत आणि नृत्य करण्यासाठी ऊर्जाही आपणच दिलीत. हे नारायणस्वरूप गुरुदेवा, हे सर्व श्रेय आपल्याच चरणी अर्पण होऊ दे. यात आमचे काहीच नाही. हे गुरुदेवा, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
कृतज्ञतापूर्वक,
– कु. अपाला औंधकर (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३०.५.२०२३)
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळी पोचल्यावर आणि नृत्य करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती१. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळीअ. ‘कार्यक्रमाच्या स्थळी (राजहंस नौदल सभागृह, दाबोली, वास्को) पोचल्यावर मनाला पुष्कळ चांगले वाटत होते. आ. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून क्षीरसागराच्या लाटांचा नाद ऐकू येऊ लागला आणि माझे मन शांत झाले. इ. तिथे विष्णुतत्त्व जाणवू लागले आणि गुरुदेवांचीच संकल्पशक्ती कार्यरत होऊन त्यांचे पुष्कळ अस्तित्वही जाणवत होते. २. नृत्यसेवा आरंभ केल्यावरअ. नृत्यसेवा आरंभ केल्यावर माझ्या मनात ‘माझ्या समोर कोण आहे किंवा माझे नृत्य चांगले होईल ना ?’, असे कोणतेच विचार आले नाहीत. आ. नृत्य चालू झाल्यापासून संपेपर्यंत मला गुरुदेवांचेच रूप सर्वत्र दिसत होते आणि माझे मन निर्विचार होऊ लागले.’ – कु. अपाला औंधकर |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |