पुन्हा शैक्षणिक शुल्क भरावे म्हणून शाळा प्रशासनाचा तगादा
पुणे – वाघोली येथील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’च्या विनय भेडरकर या लेखापालने (अकाऊंटटने) ५ महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भरलेले शैक्षणिक शुल्क (फी) परस्पर स्वत:च्या खात्यात (अधिकोषांमध्ये) जमा करून शाळेची आर्थिक फसवणूक केली. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरीही शाळा पुन्हा पालकांकडे शुल्क मागत आहे. त्याच्या निषेधार्थ महिला पालकांनी शाळेमध्ये ठिय्या आंदोलन केले. २ घंटे पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात विवाद झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून महिलांना शांत केले. (हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे ! – संपादक)
ज्या पालकांनी शैक्षणिक शुल्क त्याच्याकडे जमा केले. त्यांचे शुल्क बाकी दिसत असल्याने शाळा प्रशासनाने त्यांच्याकडे मागणी केली. पालकांनी याविषयी शाळा प्रशासनाला भेटण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही. पर्याय म्हणून शाळेमध्ये ठिय्या आंदोलन केले. आंदोलक आणि शाळा प्रशासन यांची चर्चा झाली. पालक आक्रमक झाल्याने शेवटी प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
एक महिला पालक म्हणाले, ‘ते शाळेचे लेखापाल होते. आम्ही शैक्षणिक शुल्क त्यांच्याकडे जमा केले. त्याचे दायित्व शाळेचे आहे. त्याने शाळेची फसवणूक केली; परंतु शाळा आमच्याकडे पुन्हा शुल्क मागत आहे, म्हणून आंदोलन करावे लागले. मुख्याध्यापक मुनीष शर्मा म्हणाले, ‘‘ज्या पालकांची समस्या आहे, त्यांच्याविषयी शाळा व्यवस्थापनाला माहिती देऊ. ते योग्य निर्णय घेतील. या पालकांच्या मुलांना आम्ही शाळेत येण्यात अटकाव केला नाही.’’