‘मला ‘OCD (Obsessive Compulsive Disorder)’ ‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, हा मानसिक आजार आहे. या आजारामध्ये मनात कोणत्याही गोष्टीचा निरर्थक विचार असतो. मनात पुनःपुन्हा तेच विचार येतात. मनात सगळ्या विचारांचा गोंधळ असतो. त्यामुळे ‘मनात काय चालू आहे ?’, हे कुणाला सांगता येत नाही. एकदा एकाला सांगून शांत वाटत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी पुनःपुन्हा बोलावेसे वाटते. काहीही करून मन शांत रहात नाही. यात जास्त मानसिक त्रास होतो. काही विचार असे असतात की, कुणाला सांगणेच काय; पण ते कागदावर लिहिणेही शक्य होत नाही. या त्रासावर मी गेल्या ६ – ७ वर्षांपासून औषध घेत आहे; पण त्याचा मला काहीच परिणाम जाणवला नाही.
३०.४.२०२२ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी या आजारावर मला ‘श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप प्रतिदिन २ ते ३ घंटे करण्यास सांगितला. त्याप्रमाणे मी हा नामजप १ मास केला. हा नामजप करण्यापूर्वी मला होणारे त्रास आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने माझ्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. शारीरिक त्रास आणि नामजपामुळे झालेले पालट
अ. बर्याच साधकांनी मला सांगितले, ‘‘आधी तुझ्या चेहर्यावर उग्रता असायची. आता ती न्यून होऊन चेहरा सौम्य झाला आहे. आता तुझा चेहरा टवटवीत (फ्रेश) दिसतो.’’
आ. पूर्वी माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. आता त्यांचे प्रमाण न्यून झाले आहे.
इ. पूर्वी मी सकाळी विलंबाने उठायचे, तसेच दुपारी झोपून परत रात्री झोपायचे; कारण माझे मन सतत विचार करून दमत असे आणि त्यामुळे मला झोप येत असे. पूर्वीपेक्षा माझ्या झोपेचे प्रमाण न्यून झाले आहे.
ई. आधीच्या तुलनेत माझ्या हालचाली, बोलण्यातील चढ-उतार आणि शरिराची अस्थिरता न्यून होऊन मी काही प्रमाणात शांत अन् स्थिर झाले आहे.
२. मानसिक त्रास आणि नामजपामुळे झालेले पालट
२ अ. त्रासाचे स्वरूप : मी आधी पुष्कळ निराश आणि निरुत्साही असायचे.
२ अ १. पालट : आता माझा उत्साह वाढला आहे.
२ आ. त्रासाचे स्वरूप : माझ्या मनात भीतीचे वेगवेगळे विचार असायचे. ते विचार माझ्या मनात आध्यात्मिक त्रासामुळे येत असले, तरीही ते OCD मुळे वाढायचे आणि मनात तेच तेच विचार पुनःपुन्हा यायचे.
स्वभावदोष आणि अहं यांमुळे पुष्कळ प्रसंग घडत असत; पण मला ते प्रसंग अनेक दिवस किंवा अनेक मास सोडून देता येत नसत. काही प्रसंगांत तर मी अनेक वर्षे अडकले होते. त्यामुळे मला मानसिक त्रास होत असे. त्याचा लाभ घेऊन वाईट शक्ती माझ्या मनातील ते विचार टोकापर्यंत नेत असत.
२ आ १. पालट : आता मला ते प्रसंग लवकर सोडून देता येतात. कधी काही मिनिटांत, तर कधी काही घंट्यांत मला त्या प्रसंगांतून बाहेर पडता येते.
२ इ. त्रासाचे स्वरूप : मला समष्टीत रहाणे कठीण व्हायचे. माझी समष्टी प्रकृती असल्याने मला एकटीलाही रहाता येत नसे. त्यामुळे मला जास्त मानसिक त्रास व्हायचा. या त्रासात कित्येक मास जात असत. साधकांच्या समवेत असूनही मला भकास वाटायचे. मी खोलीत एकटी जात नसे.
२ इ १. पालट : आता हा त्रास होणे बंद झाले आहे. मी खोलीत एकटी जाते आणि कधी आवश्यकता वाटली, तर एकटीही राहू शकते.
२ ई. त्रासाचे स्वरूप : प्रतिदिन ‘स्वतःचे आवरणे, उदा. झोपेतून उठणे, स्नान करणे, कपडे धुणे’ इत्यादी कृती करण्याचा मला इतका ताण यायचा की, ‘दिवस उजाडायलाच नको’, असे मला वाटायचे.
२ ई १. पालट : आता मला प्रतिदिन आवरायचा ताण येत नाही. कधीतरी माझ्या मनात विचार येतो, ‘कसे करायचे ?’; पण मला ताण येत नाही.
२ उ. त्रासाचे स्वरूप : माझ्या मनात कर्करोगासारख्या आजारांची भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.
२ उ १. पालट : आता माझ्या मनातील भीती न्यून झाली आहे. माझ्या मनात विचार आल्यावर मला काही क्षण भीती वाटते; पण त्यामुळे ‘शरीर थंड होणे, सुचणे बंद होणे’, असे त्रास होत नाहीत.
२ ऊ. त्रासाचे स्वरूप : ‘बहिर्मुखता’ आणि ‘निष्कर्ष काढणे’, या स्वभावदोषांमुळे माझ्या मनात साधकांविषयी विचार यायचा, ‘त्यांनी अशी चूकच केली आहे.’ प्रत्यक्षात मला त्यांची स्थिती ठाऊकही नसायची.
२ ऊ १. पालट : आता माझ्या मनात वरील विचार आला, तरी मला तो सोडून देता येतो किंवा ‘त्या साधकाची नेमकी स्थिती काय होती ?’, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करता येतो. आता कधीतरी मनात साधकांच्या चुकांविषयीचे विचार येतात; पण त्यांचा परिणाम माझे शरीर किंवा मन यांवर होत नाही.
२ ए. त्रासाचे स्वरूप : कुणी काही बोलले किंवा कुणाची चूक दिसली की, मला त्याचा त्रास व्हायचा आणि मी चिडचिड करून तेथून निघून जायचे.
२ ए १. पालट : आता नामजप चालू असल्याने कुणीही काहीही बोलले किंवा चुकले, तरीही माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही. मी माझी सेवा करते. माझ्या सेवेची फलनिष्पत्ती आधीच्या तुलनेत वाढली आहे.
२ ऐ. त्रासाचे स्वरूप : आधी काही प्रसंग झाल्यावर मी सेवा सोडून द्यायचे आणि त्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मला वेळ लागायचा.
२ ऐ १. पालट : नुकताच एका साधकाच्या समवेत एक प्रसंग झाला. तेव्हा मी थोडी अस्थिर झाले; पण देवाच्या कृपेने माझी सेवा चालू राहिली. त्या प्रसंगातून मी अगदी थोड्या वेळात बाहेर पडू शकले.
२ ओ. त्रासाचे स्वरूप : व्यष्टी साधनेच्या आढाव्यात आढावासेवक मला स्वभावदोष-निर्मूलनासाठी सारणीचे लिखाण करायला सांगत असत; पण मला लिखाण करताच येत नसे; कारण माझे मन सतत गोंधळलेले असायचे. माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण इतके असायचे की, मी दमून जात असे आणि मला लिखाण करण्यासाठी ऊर्जा पुरत नसे.
२ ओ १. पालट : मनातील विचार न्यून झाले असल्याने माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्याचे प्रयत्न आपोआप होतात. आता मला सारणी लिखाणही करता येते.
३. बौद्धिक स्तरावरील त्रास आणि नामजपामुळे झालेले पालट
३ अ. त्रासाचे स्वरूप : आधी मला ‘सेवा कशी करायची ?’, हे सुचत नसे. मला सेवेविषयीचे ईश्वरी विचार ग्रहण करता येत नसत.
३ अ १. पालट : माझी एकाग्रता वाढली आहे. सेवेतील बारकावे मला आपोआपच सुचतात. एकदा नामजप करत असतांना माझ्या मनात सेवेविषयी एक विचार आला आणि तो मी उत्तरदायी साधिकेला सांगितला. त्या वेळी ‘तो विचार अधिक योग्य होता आणि तो विचार देवानेच मला दिला होता’, असे माझ्या लक्षात आले.
मानसोपचार तज्ञांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘या आजारात मनातील विचार एकमेकांत अधिक गुंतलेले असतात. ते सुटत गेले की, तुला आणखी सुचेल आणि देवाचे विचार ग्रहण करता येतील.’’
३ आ. त्रासाचे स्वरूप : ‘मनात आलेला विचार कोणत्या स्वभावदोष किंवा अहं यांमुळे आहे ?’, हे मला कळत नसे.
३ आ १. पालट : ‘मनात आलेला विचार कोणत्या स्वभावदोषामुळे आहे ?’, हे माझ्या लक्षात येते आणि ‘त्याचे मूळ काय आहे ?’, हे मला समजते. त्यामुळे माझे मन शांत असते. ‘आता मन जरा जरी अस्थिर झाले, तरीही मनात कोणते विचार चालू आहेत ?’, याकडे माझे लक्ष असते.
४. अन्य त्रास
४ अ. त्रासाचे स्वरूप : मला होणार्या त्रासांविषयी मी साधकांशी बोलत रहायचे. एका साधकाशी बोलून मला शांत वाटत नसल्याने मी अनेक साधकांशी बोलायचे. त्यामुळे त्यांचा वेळ जायचा आणि मी त्याच विचारांत अडकून रहायचे.
४ अ १. पालट : आता साधकांशी न बोलता स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करून मला त्रासदायक विचारांतून बाहेर पडता येते. अगदीच आवश्यकता वाटली, तर अनेक जणांशी न बोलता एखाद्या साधकाशीच बोलते.
४ आ. त्रासाचे स्वरूप : मी सेवा करू शकत नव्हते.
४ आ १. पालट : आता मला थोडीतरी सेवा करता येत आहे.
५. आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि उत्तरदायी साधिका यांनी सांगणे
‘तुला होणारा आध्यात्मिक त्रास आता न्यून झाला आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि उत्तरदायी साधिका यांनी मला सांगितले. उत्तरदायी साधिका मला म्हणाली, ‘‘आधी तुझा केवळ त्रासच दिसायचा; पण आता गुण बाहेर येत आहेत. दोन्हींचे प्रमाण ५० – ५० टक्के आहे.’’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |