चिपळूण – मुंबईचे अर्थकारण लुटण्यासाठी भाजपला सत्ता हवी यासाठी शिवसेना संपवण्याचा निर्धार त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष फोडला मुंबईतला मराठी माणूस संपवून टाकण्याचा विचार आहे. हा विचार रोखण्यासाठी उद्धवजी उद्धव ठाकरेंची शिवसेना सक्षम आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केले.
तालुक्यातील कापसाळ येथील माटे सभागृहात ‘इंडिया आघाडी’च्या प्रमुख पदाधिकार्यांची सभा झाली. या वेळी उमेदवार खासदार विनायक राऊत बोलत होते.
लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून विकृत वाणी बाहेर पडेल, यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालणार नाही. यापूर्वी गडचिरोली, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील जिल्हा झाला होता. आमच्या कारकीर्दीत आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. गुजरात मधील उद्योजक जी.एस्.टी. ला कंटाळून विदेशात गेले. नोटाबंदीने देशाला कंगाल केले. कोकणातील काही गावे सिडकोच्या कह्यात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. कोकणची स्वाभिमानी जनता याला विरोध करेल.
माजी आमदार रमेश कदम म्हणाले, ‘‘या वेळची निवडणूक आगळी वेगळी आहे. ईडीचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत. एक प्रकारे जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रकार आहे. यासाठी सत्ता बदलण्याची आवश्यकता आहे. सज्जन, प्रामाणिक विनायक राऊत यांना निवडून द्या. गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आघाडीचा उमेदवार निवडून आणा.
राष्ट्रवादी नेते प्रशांत यादव म्हणाले, ‘‘महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकला नाही, हे दाखवून देण्यासाठी आपापसातील मतभेद दूर करून सर्वांनी एकत्र येऊन विनायक राऊत यांना विजयी करूया.’’