शैक्षणिक शुल्क परत मिळावे, म्हणून पालकांचा चिंचवड (पुणे) पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना घेराव !

रावेत येथील ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’ प्रकरण !

५ कोटी रुपये अडकल्याचा पालकांचा दावा 

पिंपरी (जिल्हा पुणे) – रावेत येथील ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’च्या संचालकांनी आगाऊ शैक्षणिक शुल्क आकारले आहे. आम्हा पालकांचे ५ कोटी रुपये अडकले आहेत. आम्ही आर्थिक अडचणींमध्ये असून आमची तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करत संतप्त पालकांनी चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना घेराव घातला. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंद करू. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे उत्तर पोलिसांनी पालकांना दिले. (पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देणे म्हणजेच पीडित पालकांवर अजून अन्याय करण्यासारखे नाही का ? पोलिसांनी पालकांची समस्या समजून घेऊन स्वत:हून कृती करणे आवश्यक ! अन्यथा जनतेला पोलिसांचा आधार कसा वाटणार ? – संपादक)

‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’ने मे २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत शिक्षण दिले. त्याचे शिक्षण शुल्क ‘स्टुडंट बँके’मध्ये भरले आहे. या अ‍ॅकॅडमीने ११ वीचेही शिक्षण पूर्ण केले नाही. त्यांच्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याचेही पुढे आले आहे. ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’चा संचालक नौशाद शेख याच्यावर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे; परंतु पोलीस आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून आमचे पैसे परत करावेत, एवढेच आमचे म्हणणे आहे, असे पालकांनी सांगितले. (अशा शिक्षण संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल का करू नयेत ? – संपादक) साहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे म्हणाले की, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’ने पालकांची फसवणूक केली आहे, अशी तक्रार शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात येऊ शकतो. पालकांच्या अर्जावर नौशाद शेख आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद करता येत नाही. पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागांकडून तक्रार प्राप्त होणे आवश्यक आहे.

राज्यातील विविध भागांतील पालक जमा !

गुजरात, जळगाव, नाशिक, नागपूर, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मंचर, संगमनेर, मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे, पुलगाव, अंकलेश्वर आदी शहरांतून पालक संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर जमले होते. तिथे चर्चा केल्यानंतर सर्वजण पोलीस आयुक्तालयाकडे गेले.