‘३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना कार्याविषयी न विचारता त्यांच्या साधनेतील अडचणी विचारून त्या सोडवण्यासाठी आणि साधनेसाठी मार्गदर्शन करत’, हा भाग पाहिला. त्यांनी ‘कार्य हे शीघ्र गतीने साधना करण्याचे माध्यम कसे आहे ?’, ते साधकांच्या लक्षात आणून देऊन ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांची सांगड घालण्यास कसे शिकवले’, ते येथे दिले आहे. (भाग १२)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://sanatanprabhat.org/marathi/779456.html
५. शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधनेचे (सेवेचे) महत्त्व !
व्यष्टी साधनेकडे साधकांचे दुर्लक्ष झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या सेवा थांबवल्या. असे असले, तरी ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधना (सेवा) (टीप ३) करणे कसे महत्त्वाचे आहे ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या पुढील काही सूत्रांवरून लक्षात येते.
(टीप ३ : समाजात साधनेचा प्रचार करणे, धर्मजागृती करणे इत्यादी.)
५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना अंतर्मुख करण्यासाठी सेवेविषयी विचारलेले काही प्रश्न : परात्पर गुरु डॉक्टर पुढीलप्रमाणे प्रश्न विचारून ‘सेवा साधना म्हणून कशी करायला हवी ?’, ते लक्षात आणून देऊन साधकांना अंतर्मुख करत असत.
अ. सेवेतून आनंद मिळतो का ?
आ. सेवेत झालेल्या चुका सारणीत लिहिता का ?
इ. सेवेत झालेल्या चुका सत्संगात सांगता का ?
ई. ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यांसाठी प्रयत्न करता का ?
उ. चुकांसाठी प्रायश्चित्त घेता का ?
ऊ. सेवेतून शिकायला मिळालेल्या सूत्रांचे लिखाण करता का ?
ए. शिकायला मिळालेल्या सूत्रांतील समष्टीसाठी उपयुक्त सूत्रे लिहून ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यासाठी पाठवता का ?
५ आ. साधकांची शीघ्र गतीने साधना होण्यासाठी कार्य हे एक माध्यम असणे : साधकांनी साधना म्हणून गुरुकार्य करणे अपेक्षित आहे. कार्य म्हणजे सेवा करण्याच्या माध्यमातून साधकांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लवकर लक्षात येतात. एरव्ही नुसती व्यष्टी साधना करतांना ते तितक्या प्रमाणात लक्षात येत नाहीत. स्वभावदोष घालवण्यासाठी प्रयत्न केल्यावर साधकांमध्ये गुणसंवर्धन होते. ईश्वराशी अनुसंधान ठेवून सेवा केल्यामुळे अनुभूती येतात. त्यामुळे श्रद्धा आणि भाव वाढायला साहाय्य होऊन साधना शीघ्र गतीने होते.
६. शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधना, म्हणजे सेवा करणे आवश्यक असणे; पण ‘सेवेत चुुका होऊन अधोगती होऊ नये’, यासाठी व्यष्टी साधनाही आवश्यक असणे
साधनेत शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी समष्टी साधना करणे आवश्यक आहे. समष्टी साधनेच्या अंतर्गत समाजात जाऊन ‘धर्मप्रचार करणे’ हे येते, म्हणजे समष्टी साधना होण्यासाठी सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. समष्टी साधनेला काळानुसार ६५ टक्के महत्त्व आहे; परंतु ही समष्टी सेवा साधना म्हणून न केल्यास आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याचा लाभ होत नाही किंवा अल्प होतो. काही वेळेला समष्टी सेवा करतांना गंभीर चुका झाल्यास साधनेत अधोगतीही होऊ शकते. ‘तसे होऊ नये’, यासाठी व्यष्टी साधना करणे अत्यंत आवश्यक आहे.
७. साधना शीघ्रतेने होण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी सेवेची सांगड घालणे आवश्यक !
७ अ. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वभावदोषांच्या निर्मूलनासह गुणसंवर्धन करणे आवश्यक असणे : ‘ईश्वर प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करतो. ईश्वरामध्ये एकही स्वभावदोष नसून तो सर्वगुणसंपन्न आहे. आपण ईश्वराशी एकरूप होण्यासाठी परिपूर्ण सेवा करायला शिकले पाहिजे. सेवा करतांना लक्षात आलेले स्वभावदोष दूर करण्याचे प्रयत्न करण्यासह आवश्यक गुणांची वृद्धी करणेही आवश्यक आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या मनावर सतत बिंबवत असत.
७ आ. समष्टी सेवा करतांना ‘त्यातून साधना होत आहे ना ?’, याकडे लक्ष दिल्यास साधना शीघ्रतेने होणे : ‘साधकांनी केवळ कार्य करणे’, हे गुरुदेवांना अपेक्षित नाही. केवळ कार्य करत राहिल्यास तो कार्यकर्ता बनणार. आपल्याला केवळ कार्यकर्ते नको, तर चांगला साधक बनण्यासाठी कार्य करायचे आहे; म्हणून साधकांनी कार्य करतांना साधनेकडे सतत लक्ष देणे आवश्यक आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवेविषयी केलेले हे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लक्षात घेऊन साधकांनी ‘सेवा करतांना त्यातून साधना कशी होईल ?’, याकडे लक्ष दिल्यास त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊ शकते.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली अन्य महत्त्वाची सूत्रे
अ. सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे.
आ. सेवा हे साधना शीघ्रतेने होण्याचे माध्यम आहे.
इ. देव ‘तुम्ही कुठली सेवा करता ?’, हे पहात नाही, तर ‘तुम्ही ती सेवा कशी करता ?’, हे पहातो.
ई. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे, ही साधना आहे.
उ. कार्य मोक्षाला जात नाही, तर साधकांना मोक्षाला जायचे आहे.
९. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधना म्हणून कार्य (सेवा) कसे करावे ?’, किंबहुना ‘कार्यातून साधना झाली पाहिजे’, हे शिकवल्याने सेवेच्या व्यस्त वेळापत्रकातही साधनेकडे लक्ष दिल्याने माझ्या साधनेवर परिणाम झाला नाही. ही परात्पर गुरुदेवांनी माझ्यावर केलेली कृपाच आहे. ‘कार्य आणि साधना यांचा मेळ कसा बसवावा ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी शिकवलेले ज्ञान अमूल्य आहे. याविषयी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच होईल.
१०. प्रार्थना
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘प्रत्येक साधकाला तो करत असलेली सेवा साधना म्हणून करण्याची बुद्धी होवो’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’
इदं न मम ।’ (हे लिखाण माझे नाही !)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, देवद आश्रम, पनवेल. (१६.१०.२०२३)
या धारिकेचे संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे१. ‘व्यष्टी साधना गांभीर्याने केली पाहिजे. २. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले, तर साधना व्यय न होता पुढे जाईल. ‘यात मी न्यून पडते’, असे मला जाणवले. माझ्यातील स्वभावदोषांमुळे चुका होऊन माझी साधना व्यय होत आहे आणि नुसतेच कार्य केले जात आहे. ‘गुरुदेवा, स्वभावदोष निर्मूलनासाठी तुमच्या कृपेने माझ्याकडून प्रयत्न होवोत’, ही तुमच्या चरणी अनन्य शरणागतीने प्रार्थना !’ – शरणागत कार्यकर्ती, श्रीमती देवल (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.३०२४) |