कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या ४१ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

(प्रतिकात्मक चित्र)

सांगली – पेठनाका येथे परिसरात पोलीस पहारा देत असतांना त्यांना ‘दयानंद अकॅडमी’समोर कत्तलीसाठी गोवंशियांची एका टेंपोमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाड घातली असता टाटा टेंपो क्रमांक ‘एम्.एच्. ४३ ई २४५०’ मध्ये ३४ गोवंशीय आढळून आले. पोलिसांनी टेंपोचालक सचिन वारे याला कह्यात घेऊन अधिक अन्वेषण केले असता हा गोवंश सचिन साळुंखे (रा. पेठनाका) यांचे असल्याने निष्पन्न झाले. या गोवंशियांना टेंपोमध्ये दाटीवाटीने कोंबून चारा-पाणी न देता बसवण्यात आले होते. हा गोवंश २४ लाख ३५ सहस्र रुपये मूल्याचा आहे.

याच समवेत पोलिसांना अन्य एका टेंपोमधून ७ गोवंशियांना कत्तल करण्याच्या उद्देशाने नेतांना आढळून आले. तो गोवंश १७ लाख ७५ सहस्र रुपये मूल्याचा होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक रमेश तथा राजू धुमाळ आणि साहाय्यक दिलीप गायकवाड यांना कह्यात घेऊन एकूण ४२ लाख १० सहस्र रुपये मूल्य असलेल्या गोवंशियांची सुटका केली. या प्रकरणी एकूण ४ आरोपींना कह्यात घेतले असून सचिन साळुंखे याच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी २ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ४१ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान दिले. (गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्‍यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते. त्यामुळे या कायद्याची कार्यवाही कठोर आणि परिणामकारक व्हायला हवी ! – संपादक)