Indian Navy Rescued Pakistani : भारताने पाकच्या मासेमारांना सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांपासून वाचवले !

मासेमारांनी भारतीय नौदलाचे आभार मानत दिल्या ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा

नवी देहली – भारतीय नौदलाने सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांपासून पाकिस्तानी मासेमारांना वाचवले. यानंतर या मासेमारांनी नौदलाचे आभार मानत ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. ९ दरोडेखोरांनी २३ पाकिस्तानी मासेमारांना ओलीस ठेवले होते. नौदलाने २९ मार्च या दिवशी एक मोहीम आखून त्यांची सुटका करून दिली. हिंद महासागरातील एडनच्या आखाताजवळ अल्-कंबर या इराणी नौकेचे अपहरण झाल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. त्यानंतर ही मोहीम आखण्यात आली.

बचाव मोहीम झाल्यानंतर प्रसारित झालेल्या व्हिडिओत एक व्यक्ती, ‘मी अमीर खान आहे. मी या नौकेचा प्रमुख आहे. आम्ही इराणहून येत असतांना सोमालियाच्या दरोडेखोरांनी आमच्या नौकेचे अपहरण केले. २९ मार्चच्या दुपारी ३ वाजता भारतीय नौदलाने आम्हाला साहाय्य करण्यास आरंभ केला. त्यांनी रात्रभर काम केले. भारतीय नौदलाचे आभार ! हिंदुस्थान झिंदाबाद !’, असे सांगतांना दिसत आहे.