ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणार्यांना घाबरवणारी घटना !
पतियाळा (पंजाब) – येथे १० वर्षीय मानवी या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन मागवण्यात आलेला केक खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला आहे. केक खाल्ल्यानंतर घरातील लोकांनाही त्रास होऊ लागला होता. केक खाण्याआधी मानवी अगदी व्यवस्थित असल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या मुलीच्या आजोबांनी सांगितले की, आम्ही ऑनलाईनद्वारे संध्याकाळी ६ वाजता केक मागवला होता. तो संध्याकाळी ६.१५ वाजता आला. ७ वाजता केक कापला. हा केक खाल्ल्यानंतर सगळ्यांचेच आरोग्य बिघडले. कुणाला गरगरू लागले, तर कुणाला उलट्या झाल्या. मानवी आणि तिची ८ वर्षांची बहीण यांनीही केक खाल्ला. दोघांनाही उलट्या झाल्या. लहान बहिणीला मानवीपेक्षा अधिक उलट्या झाल्या. मानवीच्या तोंडातून फेस बाहेर आला. आम्हाला वाटले की, उलटीमुळे झाले असेल, थोड्या वेळात बरे वाटेल; कारण उलट्या झाल्यानंतर मानवी झोपायला गेली. काही वेळाने ती आली आणि पाणीही मागितले. पहाटे चारच्या सुमारास आम्ही पाहिले तेव्हा तिचे शरीर थंड पडले होते. तातडीने तिला रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.