न्यायाधीश पहाणी करणार असल्याने ‘इमॅजीन पणजी’ आस्थापनाची धावपळ !
पणजी, ३० मार्च (वार्ता.) : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे निर्माण होणार्या धूळप्रदूषणाच्या विरोधात पणजी येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’ या आस्थापनाने (‘आय.पी.एस्.सी.डी.एल्.’ने) धूळप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना चालू केल्या आहेत. धूळप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, धूळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमित स्वच्छता करणे आदी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. १ एप्रिल या दिवशी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पणजी येथील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची पहाणी करणार आहेत.
‘आय.पी.एस्.सी.डी.एल्.’ने एक प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे. त्यात पणजी येथील धूळप्रदूषणावर नियंत्रण आणण्याचे दायित्व ‘आय.पी.एस्.सी.डी.एल्.’ प्रमाणेच कंत्राटदार संस्था ‘एजन्सी मेसर्स बागकिया’, ‘मेसर्स एम्.व्ही.आर्.’ आणि ‘मेसर्स बन्सल’ यांच्याकडे देण्यात आल्याचे म्हटले आहे. ‘स्मार्ट सिटी’ची कामे ज्या ठिकाणी करण्यात येत आहेत, त्या ठिकाणी धूळ उडू नये; म्हणून दिवसातून २ वेळा टँकरद्वारे पाणी आणून त्याची फवारणी करण्यास सांगण्यात आले आहे. धूळ उडून नागरिक आणि पर्यावरण यांना हानी पोचू नये, यासाठी ही उपाययोजना केल्याचे ‘आय.पी.एस्.सी.डी.एल्.’ने म्हटले आहे. त्याचप्रमाणे कामांच्या ठिकाणी रहदारीचे नियमन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि अन्य संबंधित खात्यांचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
१ एप्रिलपासून अशा ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी रस्ते बंद करून पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भागात सुरक्षेसाठी सूचना फलक, ‘रिफ्लेक्टर’ (प्रकाश परावर्तीत करणारे उपकरण), ‘ब्लिंकिंग इंडिकेटर’ (लुकलुकणारे दिवे असलेला सूचक), अशी उपकरणे बसवण्यात आली आहेत. (संबंधित आस्थापनांनी या उपाययोजना आधीच केल्या असत्या, तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नसता ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|