संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात ४ कोटी रुपये खर्चून नव्याने सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग (सिंथेटिक ट्रॅक) केवळ पाचच दिवसांत उखडला आहे. त्यामुळे सराव करायला अडचणी येत आहेत. गेल्या वर्षभरापासून धावमार्ग पालटण्याचे चालू असलेले काम मार्चमध्ये पूर्ण झाले; मात्र अवघ्या पाचच दिवसांत हा मार्ग उखडण्यास प्रारंभ झाल्याने खेळाडू निराशेत आहेत. साधे बूट घालून सराव करतांनाही हा मार्ग उखडत आहे. त्यामुळे धावमार्गाच्या दर्जाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धावमार्ग उभारण्यावर पालिकेने ४ कोटी रुपये खर्च केले होते. धावमार्ग उखडल्याने स्थापत्य विषयक कामकाजासाठी क्रीडा संकुल बंद ठेवले आहे. सराव करतांना स्पाईक बूट (तळाकडील बाजूला खिळे असणारे बूट) वापरल्यास धावमार्ग आणखी खराब होईल, असे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक दिनेश देवकाते यांनी सांगितले.

याविषयी पालिकेच्या स्थापत्य, क्रीडा आणि उद्यान विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले, ‘‘धावमार्गाची पहाणी करून ठेकेदाराकडून नादुरुस्त मार्ग दुरुस्त करून घेतला जाईल. ठेकेदाराला अद्याप पूर्ण मोबदला दिले नाही.’’

संपादकीय भूमिका

  • धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? याचीही चौकशी व्हायला हवी !
  • कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !