व्यापारी संकुले, भाजी मार्केट येथे कारवाई !
नाशिक – ‘आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ दिवस बाकी असतांना महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील १ सहस्र ५०० गाळेधारकांकडील ४२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कर विभागाने जप्ती मोहीम चालू केली आहे. मोठ्या थकबाकीदारांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. जप्तीनंतरही ‘थकबाकी न भरणार्यांचे गाळे लिलावात काढून सुशिक्षित बेरोजगारांना हस्तांतरित केले जाणार आहेत’, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
घरपट्टीचे जवळपास २१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य असतांना जेमतेम १९५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. गाळेधारकांची थकबाकी वसूल करण्यासाठी कर विभागाने सुमारे १ सहस्र ५०० थकबाकीदार गाळेधारकांना नोटिसा बजावल्या असून विहित मुदतीत थकबाकी न भरणार्या गाळेधारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. यापूर्वीही महापालिकेच्या विविध कर विभागाकडून गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र आता ठोस कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ८ दिवसांत साधारण १० कोटी रुपयांची वसुली झाली आहे.