‘श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने !’ – नीलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी

३ महिन्यांनंतरही पसार आरोपी सापडत नसतांना पोलिसांचा अजब दावा !

धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणात पसार आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजी बुवा यांचा शोध चालू आहे. चिलोजीबुवा यांचा जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला असून त्यांनी आता उच्च न्यायालयात जामिनासाठी आवेदन प्रविष्ट (दाखल) केले आहे. तिथेही आम्ही पोलिसांचे म्हणणे चांगल्या प्रकारे मांडले आहे. चिलोजीबुवा सातत्याने वेश पालटून फिरत असल्याने ते सापडत नाहीत. त्यासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी कलम ७३ अन्वये ‘निरंतर अटक वॉरंट’ मिळवण्यासाठी आवेदन प्रविष्ट केले आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख यांनी पत्रकारांना सांगितली. (श्री तुळजाभवानीदेवी दागिने अपहार प्रकरणात महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजी बुवा हे तीन महिने होऊनही अद्याप पोलिसांना सापडत नाहीत आणि पोलीस मात्र सांगत आहे की, अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे ! ३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे ! – संपादक)

१. सदर गुन्ह्याच्या अन्वेषणात आम्हाला जे साक्षीदार मिळाले, त्यांचा आम्ही सविस्तर जबाब घेतलेला आहे. या संदर्भात कागदोपत्री भक्कम पुरावे आम्ही गोळा केले आहेत. या प्रकरणात काही जणांवर आरोप करण्यात आले आहेत; मात्र केवळ आरोप करून उपयोग होत नाही, तर तसा पुरावाही गोळा करावा लागतो.

२. या प्रकरणी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींची ‘नार्को टेस्ट’ (चाचणीद्वारे आरोपीला काही औषधे देऊन त्याच्याकडून आवश्यक ती माहिती काढून घेणे) करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. ‘त्यावर पोलिसांचे काय म्हणणे आहे ?’, असे विचारले असता नीलेश देशमुख म्हणाले, ‘‘यातील केवळ एकच आरोपी सध्या जिवंत असून तो पसार आहे. ज्यांच्यावर इतर आरोप केले आहेत, त्यांची माहिती आम्ही मंदिर समितीकडून मागवली आहे. त्यांची नावे अजून पोलिसांना मंदिर समितीकडून मिळालेली नाहीत. या प्रकरणात आरोपी सध्या आमच्या कह्यात आलेला नाही. जेव्हा आरोपी आमच्या कह्यात येईल, तेव्हा त्याचे अन्वेषण करून त्याची ‘नार्को’ करण्याविषयी निर्णय घेतला जाईल.’’