कंबोडियात भारतियांकडून बळजोरीने करवून घेतले जात आहेत सायबर गुन्हे !

  • कंबोडियातून ७५ भारतियांची सुटका !

  • ६ महिन्यांत ५०० कोटी रुपये लुटल्याचा आरोप !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – कंबोडियात जवळपास ५ सहस्र भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत, अशी माहिती समोर आल्यांनतर तेथील भारतीय दूतावासाने ७५ भारतियांची सुटका केली आहे. दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांनी ही माहिती दिली.

१. या संदर्भात १३० हून अधिक तक्रारी आल्यानंतर भारतीय दूतावासातील अधिकारी सक्रीय झाले आणि त्यांनी ही कारवाई केली. (तक्रारी येईपर्यंत अधिकारी झोपले होते का ? भारतीय नागरिक काय करत आहेत ? त्यांना काही समस्या, तर नाही ना ? याची माहिती दूतावास का घेत नाही ? – संपादक) सरकारच्या माहितीनुसार गेल्या ६ महिन्यात या सायबर गुन्हेगारीतून अनुमाने ५०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम या भारतियांकडून करून घेतले जात आहे.

२. या संदर्भात भारताच्या गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर सुरक्षा तज्ञ यांची बैठक बोलावून कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतियांची सुटका करण्यासाठी धोरण निश्‍चित केले होते.

३. अब्राहम यांनी सांगितले की, कंबोडियाच्या विविध भागांतून प्रतिदिन ४-५ तक्रारी दूरभाषद्वारे येत आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना याची माहिती देतो, तसेच या लोकांनी दूतावासापर्यंत कसे पोचावे ?, याचे मार्गदर्शन करत आहोत. अनेक लोक मानसिक धक्क्यात असल्यामुळे त्यांचे समुपदेशन करण्याचेही काम आम्ही करत आहोत. जेव्हा कंबोडियात अडकलेल्या लोकांची सुटका केली जाते, तेव्हा ते भारतात जाऊन गुन्हा नोंदवत नाहीत, ही एक मोठी अडचण आहे. जर त्यांनी गुन्हा नोंदवला, तर भारतीय पोलीस हे दलाल आणि आस्थापने यांच्यापर्यंत पोचू शकतात. (जर ते गुन्हा नोंदवत नसतील, तर गृह खाते स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई का करत नाही ? – संपादक) सध्या आम्ही केंद्रीय गृहखात्याच्या संपर्कात आहोत. आम्हाला जेव्हा एखाद्या दलालाची माहिती मिळते, तेव्हा आम्ही ती गृह खात्याला देतो.

कसे अडकले भारतीय ?

‘कंबोडियात ‘डेटा एंट्री’ची (माहितीचे संगणकात टंकलेखन करणे) नोकरी आहे’, असे समजून अनेक लोक इथे येतात; पण दलालांकडून त्यांची दिशाभूल होते आणि काही नंतर ‘आपण जाळ्यात अडकलो आहोत’, असे त्यांच्या लक्षात येते. बहुतेक लोक गरीब असल्याने आणि त्यांच्यापैकी काहींनी दलालांना नोकरीसाठी मोठी रक्कम दिलेली असल्याने ही रक्कम येथेच राहून कशीतरी वसूल करून नंतर बाहेर पडण्याचा ते विचार करतात.

संपादकीय भूमिका

  • भारतातून विदेशात नोकरीसाठी जाणारे तेथे जाऊन काय करतात ? त्यांची फसवणूक होत आहे का ?  त्यांना अन्य कोणती समस्या आहे का ? याविषयीची माहिती भारतीय दूतावास स्वतःहून का घेत नाही ?
  • भारतातून विदेशात नोकरी देणार्‍या दलालांची माहिती भारतीय अन्वेषण यंत्रणा घेत नाही का ? असे दलाल लोकांची फसवणूक तर करत नाहीत ना ? याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा भारतात नाही का ?