पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई !

मुळा मुठा नदी

पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा अन् मातीचा भराव टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नदी पात्र अरूंद होत आहे. भराव टाकून अवैध बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भाड्याने देणे किंवा विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याविषयीच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींनुसार पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पहाणी केली. सापळा रचून संबंधित सर्व वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई केली आहे. राडारोडा टाकणार्‍यांकडून महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने १ लाख १५ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नदीमध्ये भराव टाकणारे जागामालक, गाडीमालक, वाहनचालक यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच वाहनेही जप्त करण्याची चेतावणी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका 

एकदा कारवाई करून न थांबता पुढेही अशा प्रकारची कृती कुणी करणार नाही, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !