संपादकीय : आध्यात्मिक पर्यटनाची नांदी ! 

श्री रामलला मूर्ति ( अयोध्या )

भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे. अशातच भारताने आता ‘आध्यात्मिक पर्यटन’ क्षेत्रातही पाया रोवण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसर, अजमेर, वाराणसी, कटरा, सोमनाथ, शिर्डी, अयोध्या, पुरी, तिरुपती, मधुरा, द्वारका, बोधगया, गुरुवायूर आणि मदुराई अशा एकूण १४ शहरांमध्ये मोठमोठ्या उत्पादक आस्थापनांचा (ब्रँड) विस्तार होत आहे. या आस्थापनांकडून यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मान्यवर, रिलायन्स ट्रेंड्स, रेमंड्स, मार्केट ९९, पँटालून्स, डॉमिनोज्, पिझ्झा हट, रिलायन्स स्मार्ट, झुडिओ, शॉपर्स स्टॉप, बर्गर किंग, क्रोमा अशी त्या आस्थापनांची नावे आहेत. या पर्यटनाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

आतापर्यंत पर्यटनाच्या अनुषंगाने देश-विदेशांतील मौजमजेच्या किंवा मनोरंजन, करमणूक करणार्‍या ठिकाणी फिरायला जाण्याची पर्यटकांची मानसिकता होती. त्यामुळे अशा ठिकाणांमधूनच भारतालाही उत्पन्न प्राप्त होत असे. आता हा ‘ट्रेंड’ पालटत आहे. कोरोना महामारीच्या काळापासून लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन झाले आहे. केवळ सुख-पैसा यांच्या मागे धावणारे लोक आदर्श जीवनशैली स्वीकारणे, शांतीचे अनुसरण करणे, तसेच अध्यात्माकडे वळणे अशा विषयांकडे आकृष्ट झाले. आध्यात्मिक ठिकाणी, धार्मिक क्षेत्री किंवा तीर्थस्थळांना भेटी देण्याचे पर्यटकांचे प्रमाण वाढले. २२ जानेवारी २०२४ हा दिवस भारतीयच काय, तर जगभरातील लोकांच्या दृष्टीने भारतासाठी विशेष उल्लेखनीय ठरला. या दिवशी श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे सर्वत्र अध्यात्म, तसेच भक्तीभाव यांचे पुन्हा एकदा बीज रोवले गेले. लोकांमध्ये धर्म, संस्कृती, हिंदुत्व, अध्यात्म, तसेच भक्ती या विषयांची गोडी निर्माण होणे, हे प्रगतीपथावरून जाणार्‍या भारतासाठी गौरवास्पद आहे. ‘अध्यात्म’ आणि ‘धर्म’ हा सध्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. आंतरिक शांती मिळवण्यासाठी लोक धडपडत आहेत. भारतभूमी ही पूर्वापार काळापासून ‘आध्यात्मिक’ म्हणूनच ओळखली जाते. भारताला लाभलेली समृद्ध संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी, तसेच ती जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक भारताला भेट देतात. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणार्‍या भारतात उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या दालनाकडे पर्यटकांनी आकृष्ट होणे, त्या विषयांमध्ये त्यांनी स्वारस्य दाखवणे हे स्तुत्य आहे. आध्यात्मिक ठिकाणच्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या नोंदींचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळत आहे. यातून आध्यात्मिक पर्यटनाच्या कक्षा रुंदावत आहेत. हे पर्यटन सर्वांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरत आहे. या माध्यमातून प्रत्येकाच्याच कल्याणाचा मार्ग साधला जाऊ शकतो. थोडक्यात काय, तर आध्यात्मिक पर्यटन भारताला बळकटी देत आहे.

पर्यटक आणि पर्यटन आस्थापने यांचे दायित्व !

पर्यटकांच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या विचारधारेला योग्य दिशा देणेही तितकेच आवश्यक आहे. तसे झाल्यासच त्याची योग्य फलनिष्पत्ती प्राप्त होईल. पर्यटकांची आवड पहाता आता पर्यटन आस्थापनेही (ट्रॅव्हल एजन्सीज) आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आणखी काय करू शकतो ? यासाठी प्रयत्नरत आहेत. मोठमोठ्या पर्यटन आस्थापनांनीही विश्वास व्यक्त केला आहे की, भारतातील पर्यटन उद्योग वर्ष २०२४ पर्यंत १० पटींनी वाढेल. आध्यात्मिक पर्यटनाला परमोच्च उंचीवर नेतांना कोणतेही गैरकृत्य होणार नाही, याचीही काळजी पर्यटकांनी घ्यायला हवी. भारतीय चालीरिती, परंपरा, संस्कृती यांचा अनादर होता कामा नये. धार्मिक स्थळांमधील पावित्र्य आणि चैतन्य टिकवून ठेवणे हे पर्यटकांचे नैतिक दायित्व आहे. पर्यटन आस्थापनांनीही आध्यात्मिक पर्यटनाच्या अंतर्गत संबंधित स्थळी कोणतेही अपप्रकार होत नाहीत ना, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

आध्यात्मिक पर्यटनातून अंतर्परिवर्तन !

भारत ‘विश्वगुरु’ असल्याने आध्यात्मिकतेची आधारशिला भारताला लाभलेली आहे. आता ती अधिक बळकट करणे आणि वृद्धींगत करणे अपेक्षित आहे. पर्यटन आस्थापनांनी आध्यात्मिक पर्यटनाकडे केवळ आर्थिकवृद्धीच्या एकांगी दृष्टीने न पहाता त्यातून राष्ट्रोत्कर्ष कसा साधला जाईल, हे पहायला हवे. ‘विकास’ आणि ‘अध्यात्म’ दोन्ही हातात हात घालून चालल्यासच देशाची उन्नती होते. त्यामुळे केवळ ‘पैसा’ हे लक्ष्य न ठेवता पर्यटकांमध्ये खर्‍या अर्थाने अंतर्परिवर्तन साधले जावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भक्तीभाव वृद्धींगत होणे, आचारधर्म, तसेच अध्यात्म यांचा पाया टिकवणे, आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पर्यटकांची मानसिकता निर्माण करणे, धर्म-संस्कृती अबाधित ठेवणे, आध्यात्मिक पर्यटनाचा सर्वत्र प्रचार करणे, तसेच आध्यात्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी असलेले धार्मिकतेचे बीज मनामनांत रुजवणे, असे सर्व हेतू आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून साध्य व्हायला हवेत. तसे झाल्यासच खर्‍या अर्थाने धर्माला, पर्यायाने राष्ट्राला बळकटी मिळेल. आध्यात्मिक पर्यटनाचा विषय शिक्षणक्षेत्रातही अंतर्भूत केला, तर विद्यार्थीदशेपासूनच मुलांमध्ये त्याची गोडी निर्माण होईल. केवळ पैसा उडवण्याच्या मागे लागलेली पिढी निर्माण न होता ती आत्मशुद्धी होण्यासाठी प्रयत्न करील. अशा प्रकारे अध्यात्माची पार्श्वभूमी लाभलेली पिढी देशाचे भवितव्य उज्ज्वल करील !

प्राचीन, तसेच जागृत मंदिरांना भेटी देण्यातून प्रार्थना करणे, देवतेचा कृपाशीर्वाद संपादन करणे, हे संस्कार जीवनोद्धार घडवून आणतात. पावन ठिकाणच्या विविध नद्यांमध्ये केले जाणारे पवित्र स्नान आध्यात्मिक शुद्धीकरण घडवून आणते. ध्यानधारणेसाठी उपयुक्त आध्यात्मिक स्थळे आत्मिक आनंद अन् शांती यांची प्राप्ती करून देतात. या सर्वांतून आध्यात्मिकतेला प्रोत्साहन मिळते. भारताला लाभलेल्या या आध्यात्मिकतेच्या समृद्ध वारशाचे भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य आहे. सरकारनेही धार्मिक अाणि आध्यात्मिक पर्यटनाला सर्वप्रकारे चालना द्यायला हवी. आध्यात्मिकतेची अंतर्दृष्टी स्वतःत निर्माण करणे, स्वतः प्रेरित होऊन इतरांना प्रेरित करणे, हेच आध्यात्मिक पर्यटनाचे खरे गमक आहे.

आत्मिक आनंद आणि शांती यांची प्राप्ती करून देणार्‍या आध्यात्मिक पर्यटनाला सरकारने अधिकाधिक चालना द्यायला हवी !