साधिका सौ. संगीता चौधरी यांना त्यांच्या आजारपणाच्या काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. साधिकेच्या थायरॉइड ग्रंथीच्या कर्करोगासंबंधी शस्त्रकर्म होणे आणि त्यानंतर तिच्या पोटात तीव्र वेदना होणे

सौ. संगीता चौधरी

‘डिसेंबर २०२३ मध्ये मला ‘थायरॉइड ग्रंथीचा कर्करोग झाला आहे’, हे चाचणीतून समजले. त्यानंतर काही दिवसांनी माझे त्यासंबंधी शस्त्रकर्म झाले. माझे शस्त्रकर्म झाल्यावर माझ्या आरोग्यात सुधारणा होत होती; मात्र शस्त्रकर्म झाल्यानंतर आठव्या दिवशी अकस्मात् माझ्या पोटात दुखू लागले. काही दिवसांनी माझ्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. मी पाणी प्यायले किंवा काही खाल्ले की, माझ्या पोटात तीव्र वेदना होत असत.

 

२. साधिकेला होत असलेल्या शारीरिक त्रासांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि त्यांचा साधिकेला झालेला लाभ

२ अ. पोटात दुखू लागणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगणे : ५.१.२०२४ या दिवशी माझ्या पोटात दुखत होते. त्या वेळी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला. हा नामजप करूनही माझा पोटदुखीचा त्रास न्यून होत नव्हता. ७.१.२०२४ या दिवशी मी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना संपर्क केला. त्यांनी मला त्रास अल्प होण्यासाठी औषध दिले.

२ आ. पित्ताशयातील खडे दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे : डिसेंबर २०२२ मध्ये ‘माझ्या पित्ताशयात खडे झाले आहेत’, असे सोनोग्राफीत आढळले; मात्र त्याचा मला कधी त्रास झाला नव्हता. ९.१.२०२४ या दिवशी मी सद्गुरु गाडगीळकाकांना पित्ताशयातील खडे दूर होण्यासाठी नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमो भगवते वासुदेवाय – श्रीराम जय राम जय जय राम – ॐ नमः शिवाय  – ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप प्रतिदिन एक घंटा करायला सांगितला.

२ इ. आधुनिक वैद्यांनी साधिकेला १० घंटे उपवास करायला सांगणे आणि नंतर केलेल्या तिच्या तपासणीत ‘तिचे पित्ताशय बिघडले आहे’, असे आढळणे : ‘प्रतिदिनचे खाणे आणि पिणे (जेवण, पाणी, चहा इ.) यांमुळे पोट दुखत आहे’, असे माझ्या लक्षात आल्यावर मी काहीच खाल्ले नाही. तेव्हा ‘पोटदुखीचा त्रास न्यून झाला’, असे माझ्या लक्षात आले. नंतर माझ्या पोटात पुन्हा दुखू लागल्याने मी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी क्ष-किरण तज्ञांकडे गेले. माझ्या तपासणीचा अहवाल आधुनिक वैद्यांना अपेक्षित असा मिळत नसल्याने त्यांनी मला १० घंटे उपवास (काही न खाणे-पिणे) करायला सांगितला. त्यानंतर त्यांनी माझी तपासणी केली. त्यात आढळले, ‘मी १० घंटे उपाशी राहिल्यानंतर केलेल्या माझ्या ‘सोनोग्राफी’च्या (टीप) अहवालात ‘पित्ताशय फुगले आहे’, असे दिसायला हवे होते; मात्र ते आखडले होते. माझे पित्ताशय बिघडले आहे.’ त्यामुळे मी काही खाल्ले आणि प्यायले की, माझ्या पोटात दुखत असे. (टीप : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी)

२ ई. आधुनिक वैद्यांनी ‘पित्ताशयाला संसर्ग झाला असल्याने त्वरित शस्त्रकर्म करून पित्ताशय काढावे लागेल’, असे सांगणे : ९.१.२०२४ या दिवशी मी जठररोग तज्ञांकडे (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट यांच्याकडे) गेले होते. त्यांनी तपासणी करून सांगितले, ‘‘लगेचच म्हणजे आजच शस्त्रकर्म करून पित्ताशय काढावे लागेल. पित्ताशयाला संसर्ग झाला आहे. जितक्या लवकर हे शस्त्रकर्म करून घेऊ, तितके चांगले होईल.’’

२ उ. कर्करोगाशी संबंधित शस्त्रकर्म केलेल्या आधुनिक वैद्यांनी ‘आता कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धती (रेडिएशन) करण्याची आवश्यकता आहे आणि पित्ताशयाचे शस्त्रकर्म आता करू शकत नाही’, असे सांगणे : माझे पित्ताशयाचे शस्त्रकर्म करण्याच्या आधी एक क्ष किरण चाचणी करायची होती. ही चाचणी करण्यासाठी १ घंट्याचा अवधी होता.

त्याच वेळी ‘रुग्णालयातून कर्करोगाशी संबंधित शस्त्रकर्माचा अहवाल आला आहे’, असा मला निरोप मिळाला. माझे कर्करोगाशी संबंधित शस्त्रकर्म ज्या आधुनिक वैद्यांनी केले, त्यांना मी कर्करोगाशी संबंधित शस्त्रकर्माचा अहवाल आणि माझ्या पित्ताशयाच्या चाचणीचे अहवाल दाखवला. त्यांनी सांगितले, ‘‘कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धती (रेडिएशन) करण्याची आवश्यकता आहे. आता तुमच्या पित्ताशयाचे शस्त्रकर्म करू शकत नाही. सध्या आपण पोटदुखी न्यून करण्यासाठी आणि पित्तासाठी वेदनाशामक अन् प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देऊया.’’

२ ऊ. पित्ताशयाचा त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजप : मी याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितले. त्यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री हनुमते नमः । – श्री हनुमते नमः । – ॐ नमः शिवाय । – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर झालेले लाभ

३ अ. पाणी प्यायल्यावरही पोटात न दुखणे : मी सद्गुरु काकांनी सांगितलेला नामजप करायला आरंभ केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी पाणी प्यायल्यावर माझ्या पोटात दुखले नाही; मात्र मी काही खाल्ल्यावर माझ्या पोटात दुखत होते.’ मी ध्वनीमुद्रित केलेला नामजप दिवस-रात्र ऐकत होते आणि जमेल तसा करत होते.

३ आ. ११.१.२०२४ या दिवशी मी अल्पाहार केला. तेव्हा माझ्या पोटात दुखले नाही, तसेच त्यानंतरही माझ्या पोटात दुखले नाही.

३ इ. मी सद्गुरु गाडगीळकाकांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी तुमच्या त्रासाविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘सौ. संगीता यांचा पोटदुखीचा त्रास दूर होईल.’’

३ ई. ‘सद्गुरूंचा संकल्प आणि त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांच्यात किती सामर्थ्य आहे !’, हे या प्रसंगातून लक्षात येते. यात माझी साधना, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेला नामजप भावपूर्ण आणि श्रद्धेने करणे एवढेच होते. ‘संतांच्या कृपेमुळे सर्व झाले’, असे

माझ्या लक्षात आले.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर अनुभवलेले नामजपातील दैवी सामर्थ्य 

माझ्यासाठी हा प्रसंग अत्यंत दैवी होता. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले होते, ‘‘पित्ताशयाचे शस्त्रकर्म करणे माझ्यासाठी तातडीचे आहे आणि त्याच वेळी माझ्यावर प्राधान्याने ‘रेडिएशन’ करणे आवश्यक होते. ‘केवळ नामजपाच्या बळावर शस्त्रकर्म टळले’, ही अनुभूती देवाने मला दिली. देवाने माझ्याकडून नामजप करून घेतला.

५. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आपल्याला जो त्रास होतो, तो स्पष्टपणे आणि नेमकेपणाने सांगायला हवा. त्यामुळे आपल्याला संतांकडून योग्य नामजपादी उपाय मिळतात.

आ. आपण संतांनी दिलेला नामजप निष्ठेने केला की, निश्चितच आपल्याला त्याचा लाभ होतो.

इ. आपल्याला सांगितलेला नामजप आपण मनाप्रमाणे न थांबवता त्याविषयी उत्तरदायी साधकाला आढावा कळवला, तर आपल्याला आपल्या साधनेच्या दृष्टीनेही लाभ होतो, तसेच आपल्याला जी व्याधी किंवा आजार झाला आहे, त्यातूनही आपण लवकर बरे होऊ शकतो.

 ६. कृतज्ञता

कलियुगात केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी देवाने ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पृथ्वीवर पाठवून सर्वांवर पुष्कळ मोठी कृपाच केली आहे. त्याबद्दल देव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक