आदि शंकराचार्यांनी भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात एकात्मता दृढ केली ! – कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय

चर्चासत्राचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करतांना कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय, त्यांच्या समवेत डावीकडून डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये आणि डॉ. मकरंद साखळकर

रत्नागिरी – जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी स्वतःच्या जीवनकार्यातून भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील एकात्मता दृढ केली. त्यांनी परिक्रमेतून भारतातील कानाकोपर्‍यात चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच सर्वार्थाने जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन आणि जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले. ते जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एक दिवसांच्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां.वां. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने आयोजित चर्चासत्राला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे व्यासपिठावर उपस्थित होते. नवी देहलीतील भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे चर्चासत्र प्रथमच झाले.

आदि शंकराचार्य विचारांवर चर्चासत्राप्रसंगी कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांचा सत्कार करतांना डॉ. मकरंद साखळकर

चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार म्हणत वातावरण मंगलमय केले.

सकाळच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कुलसचिव प्रा. पाण्डेय म्हणाले की, भारताचा आत्मा, परंपरा, एकता, बल, अखंडता, तप, दर्शन, संस्कृती, संस्कार, सभ्यता, संयम, श्रद्धा, उदारता, स्वरूप, तत्त्व, वैभव, ज्ञान, कीर्ती, आत्मा, वाणी, गर्व, चिंतन हे जगद्गुरु आदि शंकराचार्य आहेत. आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेली ४ पीठे, त्यांना देण्यात आलेले वेद आणि त्यांची केलेली सूत्रबद्ध योजना ही आदि शंकराचार्यांची दूरदृष्टी स्पष्ट करते.

कुलसचिव पाण्डेय यांनी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या बद्रिकाश्रमाचा ज्योती मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेला द्वारकेचा शारदा मठाचा उल्लेख केला. रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, भगवान परशुराम आणि आचार्य बाळकृष्ण दीक्षित या महान विभुतींचा आदरपूर्वक उल्लेख केला.

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ६० हून अधिक संस्कृत आणि आदि शंकराचार्य प्रेमी उपस्थित होते.