सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २८ मार्च (वार्ता.) – येथील प्रतापसिंहनगरमधील गुंड दत्ता जाधव यांच्यासह २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे सातारा पोलीस दलाने भुईसपाट केली. जिल्हा प्रशासन आणि सातारा पोलीस दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई करत शहरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

शहराच्या सीमेवर असलेल्या प्रतापसिंहनगरमध्ये सतत गुन्हेगारी घटना घडत होत्या. याच वसाहतीमध्ये गुंड दत्ता जाधव याची प्रचंड दहशत होती. हत्येचा प्रयत्न, खंडणी, हाणामारी, शासकीय कामात अडथळा आणणे, असे अनेक गंभीर गुन्हे दत्ता जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांवर नोंद आहेत. सध्या गुंड दत्ता जाधव ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यां’तर्गत (मकोका) सातारा येथील कारागृहामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी गुंड दत्ता जाधव याचा मुलगा अजय उपाख्य लल्लन जाधव याने एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने आक्रमण केले होते. यामध्ये युवती गंभीर घायाळ झाली होती. प्रतापसिंहनगर येथे गुंडांच्या वरदहस्तामुळे अनेकांनी जागा बळकावून टोलेजंग इमारती बांधल्या होत्या. पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे याविषयी अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या; मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नव्हती. (जे लोकांना दिसते ते प्रशासनाला का दिसले नाही ? तक्रारी करूनही गुंडावर त्वरित कारवाई होत नाही, याचा अर्थ पोलीस आणि प्रशासन गुंडांना पाठीशी घालते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक) शेवटी २६ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे ठरवून २२ जणांची सूची सिद्ध केली. २६ मार्चच्या सकाळीच जेसीबी, बुलडोझर, डंपर, ट्रॅक्टर आणि पोलीस फौजफाटा घेऊन सातारा पोलीस प्रतापसिंहनगर वसाहतीमध्ये पोचले. या वेळी सातारा पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथील २२ गुंडांची घरे भुईसपाट केली.

संपादकीय भूमिका :

घरे बनेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?