ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

‘डमी ब्रेललिपी’ मतपत्रिकाही देणार

रत्नागिरी (जिमाका) – दिव्यांग आणि ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी घरातून मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना करतांनाच, हे मतदान ऐच्छिक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी सांगितले. १३७० दृष्टीहीन ब्रेल साक्षर मतदारांसाठी डमी ब्रेललिपी मतपत्रिका दिल्या जातील, अशीही माहिती त्यांनी या वेळी दिली.

८५ वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग मतदार यांच्या सुविधांविषयी आढावा बैठक झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले, ‘‘टपाली मतदानासाठी १२ ड अर्जाचे वाटप वेळेत पूर्ण करावे. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी ‘रॅम्प’ची सुविधा नाही, तेथे नव्याने ती करावी. ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे, तेथे दुरुस्ती करून घ्यावी. पाणी, स्वच्छतागृहे याचीही सुविधा ठेवावी. ‘व्हीलचेअर’ची किती उपलब्धता आहे, मागणी किती आहे. याविषयी आढावा घेवून, त्या बाबतची सद्य:स्थिती कळवावी.

घरापासून मतदान केंद्रांवर येण्यासाठी दिव्यांगाच्या साहाय्यासाठी एन्. एस्. एस्. आणि एन्. सी. सी. कॅडेटसना सोबत ठेवावे. तसेच त्यांना प्रशासनाच्या वतीने घरापासून मतदान केंद्रांपर्यंत पिकअप सुविधा द्यावी. अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत.’’

उप जिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी या वेळी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सविस्तर माहिती दिली.