कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !

आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला दारी येणे, श्रद्धेय माणसासाठी यासारखे सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात २७ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी कोकणातील चिपळूणच्या खेंड हद्दीतून मार्गक्रमण करणारी ग्रामदेवता (मिरजोळी) श्री महालक्ष्मी साळूबाईची शिमगा पालखी आमच्या ‘विधिलिखित’ निवासस्थानी ५०१ श्रीफळांच्या तोरणावर विराजमान झाली. वर्षभराचे कष्ट करण्यासाठी लागणारी नवीन उमेद आणि ऊर्जा देण्यासाठीच देव अंगणी आल्याचा आनंद झाला.

श्री. धीरज वाटेकर

शिमगा म्हटला की, कोकणी माणसाच्या अंगात जणू संचारते. शिमग्याची पालखी, कोकणी लोककला, सोंगं दिसायला लागतात. कोकणात गावोगावी शिमगोत्सवात ग्रामदैवते पालख्यांत बसून माणसाच्या भेटीला येतात. दारोदारी पालख्यांचे जल्लोषात स्वागत होते. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच पालख्या फिरतात.

पालखीचा मार्ग, वेळ, तपशीलवार नियोजन पूर्व प्रसिद्ध होत असते. त्या मार्गावर, आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून, सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगून लोक श्रद्धेने पालखीच्या दर्शनासाठी उभे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला, तरी कोकणातली होळी तिच्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजत असते. अलीकडे तिला पर्यटनाचे कोंदण मिळू लागले आहे. शिमग्याच्या दिवसांत देवही भक्तांची गार्‍हाणी ऐकण्यासाठी आलेले असतात. कोकणी माणसांना गावापासून मुंबई-पुण्यासह जगभर काबाडकष्ट करण्यासाठी लागणारी वर्षभराची ताकद, कुटुंबियांना आधार देण्यासाठीचा आत्मविश्वास शिमग्यातून मिळत असतो. कोकणी मनुष्य देवाला स्वत:च्या अडचणीची थेट विचारणा करतो. त्याला आपल्या ग्रामदेवतेवर भरवसा असतो, त्याला ग्रामदेवतेचा आधार वाटतो. आपल्या ग्रामदेवतेकडून मिळालेले संरक्षण त्याला महत्त्वाचे वाटते. जगाच्या पाठीवर कोकणातील गावगड्याचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अशा या ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते. कोकणातील शिमग्यात गावोगावी ज्या प्रथा-परंपरा, रितीभाती आणि लोककलांचे दर्शन होते ते स्वत:च्या यादीमध्ये ठेवून प्रत्येकाने एकदातरी ‘याचि देही…’ जरूर अनुभवावे! कोकण पर्यटन आपली वाट पहात आहे !

– पत्रकार श्री. धीरज वाटेकर, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.