Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

लाखो रुपयांचे मद्य आणि अमली पदार्थ जप्त !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर आतापर्यंत राज्यात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड राज्य निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. राज्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये मद्य, अमली पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू याही जप्त करण्यात आल्या आहेत.

१. सर्वाधिक ३.५९ कोटी रुपये एवढी रक्कम मुंबई उपनगरांतून, मुंबई शहरात २.०८ कोटी रुपयांची रोकड, तर नागपूरमध्ये १.६१ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. ही सर्व रक्कम सध्या प्राप्तीकर विभागाकडे गोळा करण्यात आली असून याविषयी कायदेशीर तपास चालू आहे.

२. राज्यात १४.८४ लाख रुपये किमतीचे बेकायदेशीर मद्य जप्त करण्यात आले. पुण्यात १ कोटी रुपये किमतीचे सर्वाधिक ३.२४ लाख लीटर बेकायदेशीर मद्य जप्त करण्यात आले. नागपुरातून ६६ सहस्र ८७८ लिटर, तर मुंबई शहरातून ३४९ लिटर, तर उपनगरांतून २० सहस्र ६६४ लिटर मद्य जप्त करण्यात आले.

३. निवडणूक आयोगाने आतापर्यंत राज्यभरात केलेल्या कारवाईत एकूण ६ लाख ९९ सहस्र ९७९ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. सर्वाधिक १ लाख ९ सहस्र ५८५ ग्रॅम अमली पदार्थ रायगडमधून जमा करण्यात आले, त्या खालोखाल मुंबई शहर आणि उपनगरे येथून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !