अमेरिकी सरकारने नौकेवरील भारतीय कर्मचार्‍यांचे केले कौतुक !

  • अमेरिकेत मालवाहू नौकेने धडक दिल्याने कोसळलेल्या पुलाचे प्रकरण

  • दुर्घटना होणार, हे लक्षात येताच नौकेवरील भारतीय कर्मचार्‍यांकडून तत्परतेने प्रशासनाला माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला !

मालवाहू नौकेने धडक दिल्याने कोसळलेला ‘फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज’

मेरीलँड (अमेरिका) – येथील बाल्टीमोरमधील पॅटापस्कॉट नदीवरील ‘फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज’ या पुलाला एका मालवाहू नौकेने धडक दिल्याने तो कोसळल्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्‍यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर प्रशासनाने तात्काळ पुलावरील वाहतूक रोखल्याने मोठ्या प्रमाणात होणारी जीवित हानी टळली. या दुर्घटनेत सध्या ६ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. ही मालवाहू नौका सिंगापूर येथील होती. ती श्रीलंका येथे जात होती. या नौकेवरील सर्व कर्मचारी भारतीय आहेत.

बाल्टिमोर पोलिसांनी सांगितले, ‘नौकेने जाणूनबुजून फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा नाही.’ अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा एफ्.बी.आय.देखील या दुर्घटनेच्या अन्वेषणात सहभागी झाली आहे. हा अपघात कसा झाला ?, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • मानवी चुकांमुळे घडणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने साधना केली, तर देव अशा चुका होण्यापासून रक्षण करील !