अमेरिकेच्या सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावल्याचा रशियाचा दावा !

मॉस्को – रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे. रशियासोबतच्या या ताज्या संघर्षावर अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या घडामोडींमुळे प्रदेशात तणाव वाढण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अलीकडेच ‘युक्रेन-रशिया युद्धात पाश्‍चात्त्य देशांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून आण्विक युद्ध करणार’, अशी धमकी दिली होती.

१. ‘नाटो’ अथात् ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ या जगातील २९ देशांचा सहभाग असलेल्या सैनिकी संघटनेने अलीकडेच बॅरेंट्स समुद्रात सैन्य सराव चालू केला आहे.

२. हा नाटोचा या दशकातील सर्वांत मोठा सैन्य सराव कार्यक्रम आहे. यात रशियाच्या  आक्रमणाला सामोरे जाण्याची सिद्धता करण्यात येत आहे.

३. रशियाच्या दाव्यानुसार अमेरिकेच्या २ सुपरसॉनिक लढाऊ विमाने रशियाच्या सीमेजवळ येत असल्याचे पाहून रशियाने त्याची ‘मिग-३१’ विमाने प्रत्युत्तर देण्यासाठी पाठवली.